मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात नव्या फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला तब्बल सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घडामोडीमागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रणनीती असल्याची चर्चा रंगली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील नाराज खासदारांशी सुमारे 30 ते 35 मिनिटे व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या चर्चेदरम्यान संभाव्य राजकीय आणि कायदेशीर परिणामांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतरच संबंधित खासदारांनी ठाकरे गटाच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
35 मिनिटांच्या व्हिडिओ कॉलमध्ये नेमकी काय चर्चा झाली?
सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदारांनी पक्ष बदलल्यास खासदारकी धोक्यात येईल का, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र राहण्याचा सल्ला दिला. दोन तृतीयांश संख्याबळ असल्यास कायदेशीरदृष्ट्या पक्षावर दावा सांगण्याची संधी उपलब्ध राहू शकते आणि खासदारकीला धोका निर्माण होणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिल्याची चर्चा आहे.
Related News
तसेच, आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रियेत मदत करण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे समजते. या आश्वासनानंतरच काही खासदारांनी ठाकरे गटाच्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या बैठकीला 6 खासदारांची दांडी
ठाकरे गटाकडे लोकसभेत एकूण नऊ खासदार असताना पक्षाने बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला केवळ तीन लोकसभा खासदार आणि एक राज्यसभा खासदार उपस्थित राहिल्याने पक्षातील उद्धव ठाकरे नाराजी उघड झाल्याचे मानले जात आहे. तब्बल सहा खासदारांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याची चर्चा असून, या घडामोडींमुळे ठाकरे गटातील संभाव्य फूट आणि आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बैठकीतील कमी उपस्थितीमुळे नेतृत्वाच्या मनधरणीच्या प्रयत्नांनाही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांमध्ये यवतमाळ-वाशीमचे संजय देशमुख, मुंबई उत्तर-पूर्वचे संजय दीना पाटील, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि धाराशिवचे ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. या सहा खासदारांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे.
मनधरणीचे प्रयत्न फसले?
ठाकरे गटातील नाराज खासदारांची समजूत काढण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत आणि संसदीय दलाचे नेते अरविंद सावंत यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. या दोन्ही नेत्यांनी संबंधित खासदारांशी संपर्क साधून त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. अनेक खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे पक्षातील नाराजी अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले. बैठकीला केवळ मोजकेच खासदार उपस्थित राहिल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली असून, पक्षातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीला कमी उपस्थिती असल्याची माहिती अरविंद सावंत यांनी स्वतः फोनवरून उद्धव ठाकरे यांना दिल्याचेही समजते. त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर नव्या आव्हानांची मालिका उभी राहिली आहे.
बंडखोर खासदारांना नोटीस
ठाकरे गटाने बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या सर्व सहा खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, बंडखोर खासदारांची संख्या दोन तृतीयांश संख्याबळाच्या जवळ पोहोचत असल्याने, कायदेशीर लढाईत ठाकरे गटासाठी आव्हाने वाढू शकतात, असे काही कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
पुढे काय?
ठाकरे गटातील सहा खासदारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घडामोडींनंतर पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे. बंडखोर खासदार अधिकृतपणे शिंदे गटासोबत जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि पक्ष नेतृत्व या नाराज खासदारांची मनधरणी करण्यासाठी कोणती रणनीती आखतात, याकडेही लक्ष लागले आहे. कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर या खासदारांची भूमिका काय असेल, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष ऐरणीवर आला असून, आगामी संसदीय अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना, पुढील काही दिवसांत या नाट्यमय घडामोडींवरून राज्यातील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
