प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे बांबू वस्तूंचा पारंपरिक व्यवसाय संकटात

बांबू वस्तूंचा

बांबू वस्तूंना मागणी घटल्याने स्थानिक कारागिरांचा रोजगार धोक्यात

अकोला :
शहरासह ग्रामीण भागात प्लास्टिकच्या वस्तूंचा वाढता वापर झाल्याने पारंपरिक बांबू वस्तूंचा व्यवसाय हळूहळू मागे पडत चालला आहे. एकेकाळी दैनंदिन घरगुती वापरासाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या बांबूपासून तयार होणाऱ्या चाळण्या, टोपल्या, सूप, परड्या, झाडू, चटया, धान्य साठवणुकीच्या पेट्या अशा अनेक वस्तूंना आता बाजारात फारशी मागणी उरलेली नाही. परिणामी या व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक कारागिरांच्या उपजीविकेवर मोठे संकट ओढावले आहे.

पूर्वी ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू आढळायच्या. स्वयंपाकघर, शेतीकाम, धान्य साठवणूक, घराची साफसफाई अशा विविध कामांसाठी बांबू वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. मात्र कालांतराने बाजारात स्वस्त, हलक्या, आकर्षक आणि सहज उपलब्ध असलेल्या प्लास्टिकच्या वस्तींनी प्रवेश केला. यामुळे ग्राहकांचा कल प्लास्टिककडे झुकू लागला आणि बांबू वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात घटली.

Related News

या बदलाचा थेट फटका स्थानिक बांबू कारागिरांना बसत आहे. बांबूपासून वस्तू तयार करण्यासाठी मोठी मेहनत, वेळ आणि कौशल्य लागते. कच्चा माल मिळवणे, बांबू कापणे, वाळवणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि नंतर वस्तू तयार करणे ही संपूर्ण प्रक्रिया खर्चिक व कष्टाची आहे. मात्र बाजारात या वस्तींना अपेक्षित दर मिळत नसल्याने कारागिरांचे उत्पन्न दिवसेंदिवस घटत आहे. अनेक कारागिरांनी हा पारंपरिक व्यवसाय सोडून मजुरी, शेतीमजूर किंवा अन्य छोटे-मोठे व्यवसाय स्वीकारले आहेत.

बांबू हा नैसर्गिक, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक स्रोत असतानाही आज त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या तुलनेत बांबूच्या वस्ती पूर्णपणे निसर्गस्नेही आहेत. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आणि निसर्गाचा समतोल बिघडण्याचे धोके लक्षात घेतले, तर बांबू वस्तूंचा वापर वाढवणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सण-उत्सव, धार्मिक विधी, विवाह समारंभ, तसेच काही ग्रामीण परंपरांमध्ये आजही बांबू वस्तूंचा मर्यादित वापर केला जातो. मात्र ही मागणी पुरेशी नसल्याने एकूण बाजारपेठेवर प्लास्टिकचेच वर्चस्व वाढत आहे. यामुळे पारंपरिक कला आणि कौशल्य लोप पावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शासकीय व स्थानिक पातळीवरून बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे. प्लास्टिक वापरावर प्रभावी नियंत्रण, बांबू वस्तूंना अनुदान, प्रदर्शन व विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाड्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये बांबू वस्तींचा वापर सक्तीने करण्यासारख्या उपाययोजना राबविल्यास या व्यवसायाला पुन्हा चालना मिळू शकते.

प्रतिक्रिया :
“पूर्वी आमच्या तयार केलेल्या बांबू वस्तूंना चांगली मागणी होती. आता प्लास्टिकच्या स्वस्त वस्तूंमुळे विक्री घटली आहे. मेहनतीच्या तुलनेत उत्पन्न कमी होत असल्याने हा व्यवसाय टिकवणे कठीण झाले आहे,”
गणेश गायकवाड, स्थानिक बांबू कारागीर

पर्यावरण संरक्षणासोबतच पारंपरिक व्यवसाय वाचवण्यासाठी समाजाने आणि शासनाने एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा बांबू कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे.

read also :https://ajinkyabharat.com/appeal-to-shiv-devotees-to-participate-in-large-numbers-in-jijau-janmotsavachi-jayyat-tayari-at-sindkhedraja/ 

Related News