आगामी पावसाळ्यातील संभाव्य तांत्रिक अडथळे, वादळ-वारा आणि अतिवृष्टीमुळे उद्भवणारे वीज संकटाचे धोके टाळण्यासाठी महावितरणने आतापासूनच व्यापक तयारी सुरू केली आहे. ज्याप्रमाणे मानवी शरीराला भविष्यातील आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी डॉक्टर आगाऊ तपासणी करतात, अगदी त्याच धर्तीवर महावितरणने नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण वीजयंत्रणेच्या ‘हेल्थ चेकअप’ म्हणजेच मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती मोहिमेचा शुभारंभ केला आहे. पावसाळ्याच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमीत कमी राखणे आणि ग्राहकांना दर्जेदार, अखंडित सेवा देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
महावितरणने या दुरुस्तीच्या कामांसाठी एक सविस्तर आणि नियोजित वेळापत्रक तयार केले आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील विविध भागांत दर बुधवारी देखभाल-दुरुस्तीच्या कामांवर विशेष भर दिला जाणार आहे. तथापि, कामाचा आवाका आणि निकड लक्षात घेता, गरज भासल्यास इतरही दिवशी ही कामे पूर्ण केली जातील. या पूर्वनियोजित मोहिमेमुळे संपूर्ण वीज यंत्रणेची कार्यक्षमता वाढणार असून, ऐन पावसाळ्यात होणाऱ्या तांत्रिक बिघाडांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्यास मदत होणार आहे. या कामांच्या स्वरूपाचा विचार करता, संबंधित भागांतील वीजपुरवठा ठराविक काळासाठी खंडित ठेवणे अनिवार्य आहे, जेणेकरून तांत्रिक कर्मचारी सुरक्षितपणे आपली कामे पूर्ण करू शकतील.
मान्सूनपूर्व कामांच्या या विस्तीर्ण आराखड्यात अनेक महत्त्वाच्या तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने वृक्ष छाटणीवर भर दिला जात असून, वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या किंवा वादळात धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी केली जात आहे. यंत्रणा सक्षमीकरणाच्या अंतर्गत जुन्या आणि गंजलेल्या वीजखांबांच्या जागी नवीन खांब बसवणे, सैल झालेल्या तारांमधील झोल काढून त्या घट्ट करणे आणि अत्यंत जुन्या झालेल्या वीजतारा बदलण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
Related News
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रोहित्रे (Transformers), फिडर पिलर आणि रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासले जात असून, रोहित्रांचे ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. तांत्रिक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, फिडर पिलरची स्वच्छता करून त्यावर इन्सुलेशन स्प्रे मारणे आणि महत्त्वाच्या व रहदारीच्या ठिकाणी वीजतारांना ‘गार्डिंग’ करणे यासारख्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.
वाढता उन्हाळा आणि उष्णतेची संभाव्य लाट लक्षात घेता, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकडे महावितरणचे विशेष लक्ष आहे. याबद्दल अधिक माहिती देताना महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, ग्राहकांचा उन्हाळा सुसह्य व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. मात्र, पावसाळ्यातील संभाव्य मोठे धोके आणि दीर्घकाळ खंडित होणारा वीजपुरवठा टाळण्यासाठी ही मान्सूनपूर्व दुरुस्ती अत्यंत आवश्यक आहे. वीजपुरवठा केवळ प्रत्यक्ष कामाच्या वेळेपुरताच बंद ठेवला जाईल आणि त्या संदर्भात ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमातून पूर्वकल्पना दिली जाईल.
महावितरणच्या या मोहिमेमुळे पावसाळ्यात ग्राहकांना दिलासा मिळणार असून, नागरिकांनी या कामादरम्यान होणाऱ्या अल्पकालीन गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, सोबतच वीज बंद राहणार असल्याची सुचना आगाऊ मिळावी आणि वीज बंदची तक्रार त्वरीत नोंदविण्यासाठी जास्तीतसास्त ग्राहकांनी त्यांचा मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी करावी, असे आवाहनही महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
