वाडेगाव येथे धक्कादायक प्रकार उघड, संगणक चालकाची कबुली

वाडेगाव

बाळापूर :  तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायतीत घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टरचे पैसे परस्पर काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामपंचायतचा संगणक चालक कर्मचारी शशिकांत राहणे यांनी लाभार्थ्यांची दिशाभूल करून रक्कम घेतल्याची बाब तपासादरम्यान समोर आली आहे. हा प्रकार सुमारे सात महिन्यांपूर्वी घडल्यानंतर आता उघड झाला असून गावकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

वाडेगाव येथील राधेश्याम कळसकार यांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. अनुदानाची एक रक्कम मिळाल्यानंतर उर्वरित मस्टरचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी जॉब कार्डद्वारे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, चौकशी करत असताना “पैसे आले आहेत” असे सांगितले जात होते; प्रत्यक्षात मात्र त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होत नव्हती.

लाभार्थींनी रोजगार सेवकांकडून ऑनलाईन माहिती तपासल्यानंतर मस्टरची रक्कम जॉब कार्डशी संलग्न असलेल्या दुसऱ्याच खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. चौकशीअंती ही रक्कम संगणक चालक शशिकांत राहणे यांनी परस्पर घेतल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र सविस्तर विचारणा झाल्यानंतर त्यांनी पैसे घेतल्याची कबुली दिली. अखेर ३ हजार ५६४ रुपये ऑनलाईन पद्धतीने संबंधित लाभार्थी राधेश्याम कळसकार यांच्या खात्यावर परत करण्यात आले.

Related News

गावात यापूर्वीही मस्टरचे पैसे लाभार्थींना न मिळण्याचे आणि ग्रामपंचायतीत वारंवार हेलपाटे मारावे लागण्याचे प्रकार घडल्याची चर्चा आहे. काही वेळा जॉब कार्डमध्ये फेरफार करून तिसऱ्याच व्यक्तींच्या नावावर पैसे वळवण्यात आल्याचे प्रकारही उघड झाले होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपूर्वीही तक्रारीची धमकी दिल्यानंतर एका लाभार्थ्याला पैसे परत मिळाल्याचे प्रकरण चर्चेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, “या प्रकरणातील संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये?” असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, सरपंच मंगेश तायडे यांनी सांगितले की, घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टरचे पैसे परस्पर काढल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित रोजगार सेवक श्रीकृष्ण टाकळकर, अशोक अवचार तसेच संगणक चालक शशिकांत राहणे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या विषयावर ग्रामपंचायतीमध्ये तातडीची बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या गंभीर प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/major-changes-in-administration-under-new-governance-model/

Related News