पातूर : राज्यात विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विषय सध्या सगळीकडे चर्चिला जात आहे. गत काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदार संघातील जवळजवळ सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार बॅनरबाजी करून आपापल्या परीने मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र शिंदे गटातील संभाव्य उमेदवाराचे पोस्टर फाडल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
आता असेच पोस्टर्स पुन्हा एकदा बाळापूर विधानसभा मतदारसंघात लावण्यात आले आहे. मात्र हे पोस्टर आता शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक किंवा संभावित उमेदवार असलेल्या अनिल राऊत यांच्या नावाने लागले आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून लावण्यात आलेले हे बॅनर बाळापूर विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार अनिल राऊत हेच असल्याचे यावरून दिसून येत आहे.सदर मजकूराची बॅनर्स चर्चेचा विषय होत असताना पातूर शहरातील नविन बसस्थानक चौकात शिंदे गटाच्या अनिल राऊत यांच्या फोटोचे बॅनर शनिवारच्या रात्री अज्ञातांनी फाडले.तरीदेखील पातूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाकडून कुठलीच प्रतिक्रिया आली नसल्याने पातूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची फळी कमकुवत आहे की काय अशी उपहासात्मक चर्चा तालुक्यातील राजकीय विश्लेषकांमध्ये चांगलीच रंगताना दिसत आहे.