शहापूरच्या खड्ड्याने घेतला जवानाचा बळी; ‘खड्डा दिसला नाही का?’ पोलिसांच्या वक्तव्याचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यामुळे TDRF जवान विकास गोरे यांचा मृत्यू; ठेकेदारांवर कारवाईची मागणी
मुंबई-नाशिक महामार्गावरील जीवघेणे खड्डे आता प्रवाशांच्या जीवावर बेतू लागले आहेत. शहापूर येथील नदी पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात ठाणे आपत्ती प्रतिसाद दलातील (TDRF) जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी नेहमी पुढे असणाऱ्या जवानाचा स्वतःचा जीव रस्त्यावरील खड्ड्यामुळे गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शहापूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबीयांना पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?” असा सवाल पोलिसांनी केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
शहापूर : खड्ड्यामुळे जवानाचा मृत्यू; कुटुंबीयांचा आक्रोश
मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर परिसरात मोठमोठे खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांपैकी एका खड्ड्यात विकास गोरे यांची बुलेट आदळली आणि भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. विकास गोरे हे ठाणे अग्निशामक दलातील TDRF जवान म्हणून कार्यरत होते.
Related News
पाकिस्तानला मोठा धक्का? बलुचिस्तानची 11 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाची घोषणा
Telegram App ची पुनरागमन! ॲप स्टोअरवर परतलं, पण नव्या यूजर्ससमोर मोठी अडचण
आपत्तीच्या काळात अनेकांचे जीव वाचवणाऱ्या विकास यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विकास हे घरातील प्रमुख आधार होते. त्यांच्या जाण्याने पत्नी आणि दोन जुळ्या मुलींच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
विकास यांच्या पत्नीने भावनिक होत प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे. “देशासाठी धावणारा माझा पती गेला. आता दोन मुलींचे संगोपन कसे करायचे?” असा सवाल त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई करून कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
‘ठेकेदारांवर कारवाई करा’ म्हणत गेलेल्या कुटुंबाला पोलिसांनी सुनावल्याचा आरोप
अपघातानंतर विकास गोरे यांच्या कुटुंबीयांनी शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांसाठी जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मात्र पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी उलट कुटुंबीयांनाच प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला आहे. “तुमच्या मुलालाच खड्डा दिसला नाही का?” असे पोलिसांनी म्हटल्याचा दावा नातेवाईकांनी केला. तसेच मृत जवानावरच गुन्हा दाखल करण्याची भाषा पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
या आरोपांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आपत्तीच्या काळात समाजासाठी काम करणाऱ्या जवानाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांनाच दोष देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘माझ्या मुलाने अनेकांचे जीव वाचवले, पण त्याला मदत मिळाली नाही’
विकास गोरे यांच्या आईनेही आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत तीव्र दुःख व्यक्त केले. “रस्त्यावर अपघात झाला तरी माझा मुलगा लोकांना मदत करायचा. मात्र माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा त्याला मदत करण्यासाठी कोणी थांबले नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विकास यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. मोठा भाऊ खासगी कंपनीत काम करत असला तरी घराचा मुख्य आधार विकासच होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंब आर्थिक आणि मानसिक संकटात सापडले आहे.
विकास यांच्या भावानेही प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. “इर्शाळवाडी दुर्घटना, बदलापूर पूर आणि भिवंडीसारख्या संकटांमध्ये माझ्या भावाने जीव धोक्यात घालून लोकांना वाचवले. पण आज त्याच विकासाचा बळी रस्त्यावरील खड्ड्यामुळे गेला,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
२५ तास उलटूनही ठेकेदारांवर गुन्हा नाही; पोलिसांकडून चौकशी सुरू
विकास गोरे यांच्या मृत्यूला २५ तास उलटून गेल्यानंतरही संबंधित ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. शहापूर पोलिसांनी सध्या केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) केली आहे.
घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघाताची परिस्थिती, रस्त्याची अवस्था आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कुटुंबीयांनी मात्र या विलंबावर प्रश्न उपस्थित केले आहेत. रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेमुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न यापूर्वीही अनेकदा समोर आला आहे. पावसाळ्यात या मार्गाची अवस्था अधिक खराब होत असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
एका जवानाचा जीव गेल्यानंतरही प्रशासनाकडून तातडीची कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. विकास गोरे यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
