सावकारी कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारी

अकोला, प्रतिनिधी :
अकोला तालुक्यातील घुसर गावात सावकारी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. राजू श्याम गोपनारायण (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

राजू गोपनारायण यांच्याकडे अवघी ७४ गुंठे शेती असून शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाकरिता तसेच घरगुती गरजांसाठी त्यांनी बँक व खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. पीक अपयश, वाढता उत्पादन खर्च आणि सावकारांकडील कर्जाचा तगादा यामुळे त्यांच्यावर सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज झाले होते. या कर्जबाजारीपणामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

आज सायंकाळी राजू गोपनारायण घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. शोधादरम्यान ते शेतात विषारी औषध प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. तात्काळ त्यांना उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Related News

मृत राजू गोपनारायण यांच्या पश्चात आई, भाऊ, अविवाहित मुलगा तुषार (वय २५) आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे पुढील महिन्याच्या २२ तारखेला मुलगा तुषार याचे लग्न ठरले होते. लग्नाच्या आनंदाच्या उंबरठ्यावर असलेल्या कुटुंबावर अचानक आलेल्या या दुःखद घटनेने गोपनारायण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती अकोट फाईल पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासनाने कर्जमाफी व मदतीसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/honorable-lady-gave-gift-to-console-the-family-of-hidayat-patel-of-mohala/

Related News