अकोला शहरातील मोर्णा नदीतील वाढलेल्या जलपर्णीच्या समस्येविरोधात संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने लोखंडी पूल परिसरातील नदीपात्रात उतरून आंदोलन करण्यात आले. महापालिकेने जलपर्णी हटविण्याची मोहीम राबवली असली तरी काही दिवसांतच पुन्हा मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. जलपर्णी निर्मूलनाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलनादरम्यान महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नदीपात्रात बसून निषेध नोंदविला. मोर्णा नदीतील जलपर्णीचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी प्रभावी आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे महानगर अध्यक्ष देवा गावंडे यांनी केली. आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला.
