35 वर्षांपासून निंबा फाटा–काजीखेळ रस्ता अडखळलेला, 4 कोटी खर्चूनही रस्त्याचं काम अपुरं, गुणवत्तेवर प्रश्नचिन्हं

निंबा

३५ वर्षांपासून निंबा फाटा ते काजीखेळ रस्त्याची दुरुस्ती नाही; नागरिक त्रस्त, वाहनधारकांची डोकेदुखी, एसटी महामंडळ वैतागले

निंबा-अंदुरा सर्कलमधील अकोला जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या काजीखेळ गावापासून निमकरदा, गायगावपर्यंतचा रस्ता गेल्या ३५ वर्षांपासून दुरुस्तीअभावी अत्यंत बिकट अवस्थेत आहे. या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे एसटी महामंडळ चालक, टू-व्हीलर वाहनधारक आणि सर्व प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत.

 रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित

गेल्या कित्येक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असली तरी फक्त कागदोपत्री कामे दाखवून निधी खर्च झाल्याचे दाखवले जाते, प्रत्यक्षात मात्र रस्त्याची स्थिती जसंच्या तशीच आहे. अकोला ते बुलढाणा मार्गाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्याने त्यावरून दररोज हजारो प्रवासी आणि वाहनं धावतात. मात्र, रस्त्यावरील खोल खड्डे आणि काटेरी झुडपांमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे.

 अपघातांची मालिका सुरू

या मार्गावर दर आठवड्याला लहान-मोठे अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. खड्डे, उंचसखल रस्ता, आणि दोन्ही बाजूंनी वाढलेली झुडपे यामुळे वाहनधारकांना नेहमीच धोक्याचा सामना करावा लागतो. प्रवास करताना रस्त्याच्या असमतोलामुळे दुचाकीस्वार पडून जखमी होतात, तर चारचाकी वाहनांचे वारंवार नुकसान होते. तीन वर्षांपूर्वी चार कोटी रुपयांचा निधी खर्च करून काजीखेळ ते निंबा गावापर्यंत काही प्रमाणात काम करण्यात आलं होतं, मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्थानिकांचं मत आहे. काही ठिकाणी डांबर उखडून पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. कामाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांनी या संदर्भात चौकशीची मागणी केली आहे. शासनाने निधी खर्च होऊनही जर रस्ता पूर्ववतच राहणार असेल, तर या कामाचा उद्देशच काय, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या रस्त्याचे दर्जेदार काम होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Related News

वजेगाव येथील सरपंच पती राजेश माळी यांचा काही वर्षांपूर्वी याच रस्त्यावर अपघात झाला होता. त्या घटनेनंतरही प्रशासनाने या मार्गाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही, ही खंत आजही स्थानिक व्यक्त करत आहेत. या रस्त्यावर वारंवार नीलगाय, डुक्कर, रोही अशा वन्यप्राण्यांची वर्दळ असते, त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात आणि त्यामुळे गंभीर अपघात घडतात. रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनाही अत्यंत अपुरी असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनते. वाहनधारकांनी वेग कमी ठेवावा, अशी सुचना पोलिसांकडून वेळोवेळी दिली जाते, परंतु रस्त्याची दुर्दशा आणि वन्यप्राण्यांची उपस्थिती यामुळे अपघात टळत नाहीत. नागरिकांनी या रस्त्यावर कुंपण, प्रकाशव्यवस्था आणि दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची मागणी केली आहे.

 एसटी फेऱ्याही संकटात

निंबा-अंदुरा या रस्त्यावरून अकोला-जळगाव, अकोला-पातुर्डा आणि अकोला-भेंडवळ या तीन एसटी बसेस चालतात. प्रत्येकी दोन फेऱ्यांसाठी चालकांना आणि प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. गाडींचे स्प्रिंग तुटणे, वारंवार पंचर होणे, गिअर बिघडणे, वाहनाचे नुकसान होणे – अशा समस्यांमुळे एसटी चालक वैतागले आहेत. त्यामुळे अकोला-जळगाव एसटी फेरी रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

 सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुर्लक्ष

स्थानिक ग्रामपंचायती आणि सरपंचांनी अनेक वेळा लेखी आणि मौखिक सूचना देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने निंबा फाटा ते काजीखेळ रस्त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊनही विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांच्या स्थानिक निधीतून या रस्त्याचे काम मंजूर झाले असल्याची माहिती आहे, मात्र आजपर्यंत कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे “काम खरंच होणार की पुन्हा एकदा कागदावरच थांबणार?” असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. परिसरातील जनतेत प्रचंड असंतोष असून, शासन आणि प्रशासनाने आता तरी जाग येऊन या रस्त्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.

 नागरिकांची शासनाकडे मागणी

निंबा-अंदुरा सर्कल परिसरातील नागरिकांनी शासनाला आर्त आवाहन केले आहे की, काजीखेळ ते निंबा फाटा मार्गावरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात यावे. गेल्या तीन दशकांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत असूनही आजपर्यंत प्रत्यक्ष काम झालं नाही, याबद्दल लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रवासादरम्यान वारंवार होणारे अपघात, वाहनांचे नुकसान आणि जीवितहानीमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज या मार्गावरून शाळकरी मुले, कामगार, शेतकरी आणि एसटी प्रवासी प्रवास करतात. खराब रस्त्यामुळे त्यांचे हाल होतात. शासनाने फक्त आश्वासनं न देता प्रत्यक्ष कृती करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. स्थानिकांनी सांगितले की, “गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही निवडणुकीत आशा बाळगतो, पण रस्त्याचं चित्र तसंच आहे. आता आम्हाला फक्त शब्द नकोत, काम हवं.” शासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचं काम सुरू केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

read also:https://ajinkyabharat.com/5-shocking-updates-rumors-of-dharmendras/

Related News