मूर्तिजापूर प्रतिनिधी –
शहरातील गजानन महाराज मंदिर, लहरीया प्लॉट परिसरात दोन गटांतील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका बँक मॅनेजरवर तिघांनी मिळून काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध बीएनएस (BNS) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
फिर्यादी उपेंद्र गणपतसिंग खन्नाडे (वय ४८), रा. लहरीया प्लॉट, मूर्तिजापूर, हे पेशाने बँक मॅनेजर आहेत. दि. १९ जानेवारी रोजी रात्री सुमारे ११.१५ वाजताच्या सुमारास त्यांच्या मोहल्ल्यातील गजानन महाराज मंदिराजवळ मोठ्याने भांडणाचा आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आवाज ऐकून बाहेर पडल्यावर मंदिराजवळ लोकांची गर्दी जमलेली दिसली. परिस्थिती बिघडू नये म्हणून आणि वाद शांततेने मिटवण्यासाठी खन्नाडे तिथे गेले.
मात्र, वाद सोडवण्याऐवजी त्यांनाच मारहाणीला सामोरे जावे लागले. आरोपी शेखर उर्फ सोनू यदवर याने “तुम्ही आमचा कालचा घरगुती वाद आपसात का मिटवला?” असा जाब विचारत खन्नाडे यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर लगेचच हाणामारीत झाले. आरोपी सोनू यदवर याने हातातील काठीने खन्नाडे यांच्या पाठीवर जोरदार प्रहार केला व अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली.
Related News
यावेळी तिथे उपस्थित असलेले राहुल यदवर आणि विशाल यदवर यांनीही खन्नाडे यांना पकडून त्यांच्या चेहऱ्यावर व पाठीवर चापटबुक्क्यांनी मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खन्नाडे जखमी झाले. आरडाओरड झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
या प्रकरणी उपेंद्र खन्नाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आरोपी शेखर (सोनू) यदवर (वय ४५), राहुल यदवर (वय ३८) आणि विशाल यदवर (वय ३५), सर्व रा. राम मंदिर, स्टेशन विभाग, मूर्तिजापूर यांच्याविरुद्ध अपराध क्र. ७०/२०२६ नुसार कलम ११८(१), ११५(२), २९६, ३५१(३), ३(५) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा HC मंगेश विल्हेकर (ब.नं. १४६२) यांनी दाखल केला असून, पुढील तपास HC गजानन चांभारे (ब.नं. १६५५) करीत आहेत. रात्रीच्या वेळी शहरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
