महाविकास आघाडीला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, थोरातांना विश्वास

महाविकास आघाडीला ४० पेक्षा जास्त जागा मिळतील, थोरातांना विश्वास

अहमदनगर : ‘महाराष्ट्रात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडले नाही. ईडी सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्यायव्यवस्थेवरील दबाव सर्वत्र अस्थिरता यामुळे देशात भाजपा विरोधी मोठी लाट आहे. राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसल्याने महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला ४० पेक्षा जागा नक्की मिळतील,’ असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारासाठी संगमनेरमध्ये आयोजित सभेत थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, पंतप्रधानांनी भाषण करताना दहा वर्षात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षांत करावयाची कामे याचा अहवाल जनतेला दिला पाहिजे. मात्र सध्याचे पंतप्रधान हे धर्माचे राजकारण करत आहेत. देशात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. न्यायव्यवस्था दबावात आहे. बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर अत्याचार झाला आहे. देशासाठी ऑलिम्पिक जिंकणाऱ्या महिला खेळाडूंवर अन्याय झाल. मात्र पंतप्रधानांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सर्वत्र अस्थिरता आणि अनागोंदी आहे. देशाच्या इतिहासात भाजपचा कालखंड हा काळा इतिहास म्हणून लिहिला जाईल. त्यांनी कितीही ४०० पारचे नारे दिले तरी २०० चा आकडाही त्यांना गाठता येणार नाही, असेही थोरात म्हणाले.

वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासंबंधी थोरात म्हणाले, ‘वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांना काँग्रेसने मोठी संधी दिली. आपल्याकडे कायम त्यांचा सन्मान होत होता. राज्यात आणि देशपातळीवरही काम करण्याची संधी होती. शिर्डी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आपण मोठा प्रयत्न केला. हे सर्वांना माहिती आहे. मात्र रूपवते यांनी काँग्रेस सोडणे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. वंचितला मतदान करणे म्हणजे भाजपला मदत करणे, असे ठरणार असल्याने मतदारांनी विचारपूर्वक निर्णय घ्यावा,’ असे आवाहनही त्यांनी केले.

Related News

Related News