२१ दिवसांची अथक मोहीम अखेर यशस्वी : एलसीबी पोलिसांनी हरवलेला १४ वर्षीय मुलगा पंढरपुरातून सुखरूप शोधला
अकोला: हरवलेल्या १४ वर्षीय मुलाच्या शोधासाठी राबवण्यात आलेली अकोला पोलिसांची २१ दिवसांची सततची व धाडसी शोधमोहीम अखेर यशस्वी ठरली. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातून त्या मुलाला सुखरूप ताब्यात घेण्यात आले असून, या उल्लेखनीय यशाबद्दल तपासात सहभागी विशेष पथकास पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. ही माहिती स्वतः पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता अकोला शहरातील सरकारी गोडाऊन, खदान परिसरात राहणारा ऋषीकेश संतोष कनोजीया (वय १४ वर्षे) घरातून अचानक बेपत्ता झाला. उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला. दुसऱ्या दिवशी मुलाच्या वडिलांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अप.क्र. ९३६/२०२५ भा.न्या.सं. कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
Related News
मात्र प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे ठरले. मुलाजवळ मोबाईल नव्हता, कोणतेही लोकेशन उपलब्ध नव्हते, तो कोणासोबत गेला याची माहिती मिळत नव्हती व कोणताही संशयित व्यक्ती समोर नव्हता. त्यामुळे तपासासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले. या दरम्यान एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मुलाच्या बेपत्ता होण्याची माहिती थेट पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर विशेष पथक तयार करून सखोल तपास करण्याचे निर्देश देण्यात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी एसडीपीओ शहर विभाग व स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) विशेष टीम तपासासाठी नेमली. सुरुवातीला स्थानिक गुन्हे शाखेने मुलाची शाळा, ट्युशन क्लासेस आणि घर परिसरातील चौकशी सुरू केली. संभाव्य मित्रमंडळी, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा करण्यात आली. मात्र १६ दिवस उलटूनही कोणताच ठोस धागा मिळत नव्हता.
हताश पालकांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेत मदतीची विनंती केली. त्यानंतर एसडीपीओ शहर विभागाच्या मार्गदर्शनाखाली १ अधिकारी व १० अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक तपासाचा वेग वाढवला. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली.
सीसीटीव्ही तपासातून अखेर महत्त्वाचा धागा मिळाला. मुलगा ११ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता अकोला रेल्वे स्टेशनवरून ११४०३ अकोला–कोल्हापूर एक्स्प्रेसमध्ये बसताना कॅमेऱ्यात स्पष्ट दिसून आला. यानंतर संपूर्ण तपासाची दिशा बदलली. विशेष पथकाने नागपूर – कोल्हापूर रेल्वे मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे स्टेशन गाठले. वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, धाराशिव या सर्व ठिकाणी थांबून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. अखेरीस पंढरपूर रेल्वे स्टेशनवर मुलगा उतरताना कॅमेऱ्यात दिसून आला.
धागा मिळताच पथक पंढरपूरला पोहोचले. शहरातील गर्दीची प्रमुख ठिकाणे तपासण्यास सुरुवात झाली.
✔️ विठ्ठल – रुख्मिणी मंदिर परिसर
✔️ बसस्थानक
✔️ विविध मठ
✔️ चंद्रभागा नदी किनारा
या सर्व भागांमध्ये पोलिसांनी शोधमोहीम राबवली. नागरिकांना मुलाचा फोटो दाखवून माहिती विचारण्यात आली. अखेर २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी सरगम चौक येथील एस.के. सलूनजवळ मुलगा दिसल्याची माहिती मिळाली. तत्काळ पथकाने धाव घेऊन त्याला सुखरूप ताब्यात घेतले व आवश्यक चौकशीनंतर सुरक्षितरित्या अकोल्यात आणण्यात आले.
या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांनी—
▪️ १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली
▪️ १५० ते २०० नागरिकांची चौकशी केली
▪️ ७ जिल्ह्यांमध्ये सुमारे १५०० किलोमीटरचा प्रवास केला
▪️ मोबाईल लोकेशन, साक्षीदार वा थेट पुरावा नसतानाही तपास अखंड सुरू ठेवला
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांनी दाखवलेला संयम, कौशल्य आणि चिकाटीमुळे अखेर मुलाला सुखरूप परत आणणे शक्य झाले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी व एसडीपीओ सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष पथकात पोलीस निरीक्षक शंकर शेळके, मनोज केदारे, स.पो.नि. पुरुषोत्तम ठाकरे, पो.उप.नि. गोपाल जाधव, विष्णु बोडखे, तसेच अंमलदार गिरीष वीर, संतोष गावंडे, अनिल भातखेडे, अमर पवार, मंगेश ओडकर, शैलेश घुगे, भुषण मोरे, संदीप काटकर, स्वप्नील वानखडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे सुलतान पठाण, फिरोज खान, उमेश पराये यांनी मोलाची कामगिरी बजावली.
अकोला पोलिसांची ही कामगिरी दृढनिश्चय, संघभावना आणि आधुनिक तरीही चिकाटीच्या तपासपद्धतीचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, पोलिसांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/operation-praharchi-strong-action/
