पातूर : सैय्यद मोहसीन फाउंडेशन व लोकहित शिक्षण प्रसारक मंडळ, पातूर यांच्या वतीने संचालित हाजी सैय्यद अकबर उर्दू प्रायमरी, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पातूर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी आनंद मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, आत्मविश्वास व नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला शाळा परिसरात मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सैय्यद मुजाहिद इक्बाल सैय्यद मोहसीन होते. उद्घाटन एन. ए. कुटे (बँक मॅनेजर, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक, पातूर शाखा) आणि निलेश गवळे (युनियन बँक, पातूर शाखा) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सैय्यद गणी हाजी सैय्यद युसुफ साहेब, अ. कुद्दुस (वरिष्ठ पत्रकार), सैय्यद अनिस सैय्यद याकूब साहेब, सैय्यद मुख्तार साहेब, सैय्यद मुश्ताक राणा साहेब, शे. इरफान जागीरदार साहेब, डॉ. फिरोज खान साहेब, सैय्यद मोइन सैय्यद मोबिन साहेब, शे. वसीम साहेब (पटवारी), शे. नातिक साहेब (पत्रकार), शे. नाजिम साहेब (पत्रकार), सैय्यद खैरू सैय्यद ख्वाजा साहेब व सैय्यद मुतलिब साहेब यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सैय्यद मजहर हुसैन यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. प्रास्ताविक संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैय्यद अकबर अब्दुल्ला सैय्यद मोहसीन यांनी केले. प्रायमरी शाळेचे प्रभारी मु. अ. सैय्यद साजिद व प्राचार्य शे. नुसरतुल्ला यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Related News
आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ सादर करून विक्री केली. यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, संघभावना, जबाबदारीची जाणीव व उद्यमशीलतेचे प्राथमिक धडे मिळाले. तसेच हस्तकला, चित्रकला, सजावट व सर्जनशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये दाखवून दिली.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले की, अशा आनंद मेळाव्यासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. केवळ पुस्तकी शिक्षणावर भर न देता जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याला पालक, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आनंद, उत्साह व शिस्तबद्ध नियोजन यामुळे हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.
read also : https://ajinkyabharat.com/defeated-woman-candidate-expressing-doubt-regarding-evm-complains-to-police/
