अकोला :निस्वार्थ रुग्णसेवा परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने स्व.कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बी. पी. ठाकरे रक्तपेढी, अकोला येथे मोठ्या उत्साहात आणि लोकसहभागातून पार पडले. या शिबिरात तब्बल ३० रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्यचे संस्थापक सचिव अतुल साहेबराव भांगे यांच्या आजी स्व. कौशल्याबाई पांडुरंग भांगे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. अकोला जिल्ह्यात सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवत असून, विशेषतः थॅलेसिमियाग्रस्त रुग्ण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) मधील रुग्ण तसेच खासगी रुग्णालयांमधील गंभीर रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होणे कठीण होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिरात संकलित झालेले रक्त गरजू रुग्णांसाठी उपयोगात आणले जाणार असून, अनेक रुग्णांना यामुळे जीवनदान मिळणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका रक्तदात्याच्या रक्तामुळे तीन ते चार रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. रक्तदात्यांनी कोणताही संकोच न बाळगता मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
Related News
विशेष म्हणजे, अकोला जिल्ह्यातील रक्तटंचाई लक्षात घेता दि. २८ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत डॉ. बी. पी. ठाकरे रक्तपेढी येथे सलग तीन दिवस रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, समाजातील विविध घटकांनी पुढे येत रक्तदान केले.
या शिबिराला श्री. साहेबरावजी भांगे, श्री. विठ्ठलरावजी भांगे, श्री. गजाननजी भांगे, श्री. रामरावजी भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच डॉ. बी. पी. ठाकरे रक्तपेढीचे संचालक सचिन ठाकरे, संतोष सुलताने, अनिकेत भाई, राहुल हातोलकर, योगेश चिमणकार (समाजकार्यकर्ता), चेतन देशमुख (समाजकार्यकर्ता), वैभव गझलकर, कुंदन गिरी, संतोष वाघमारे, सागर डाबेराव, डॉ. राजकुमार वजीरे, अमोल पाटील, अक्षय खराटे, शुभम चिकटे, आदर्श सोनवणे, अक्षय राठोड, प्रतीक ढोरे, आकाश मुळे, अमोल पोपळे, चेतन ठाकरे, राजेश नजरधने, भूषण शिंदे पाटील, ऋषिकेश भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय डॉ. बी. पी. ठाकरे रक्तपेढी, अकोला येथील संपूर्ण वैद्यकीय व कर्मचारी टीम, निस्वार्थ रुग्णसेवा परिवारातील सदस्य-सदस्यिका, शाखा पदाधिकारी, शिक्षक वृंद, महिला मंडळ तसेच मित्रपरिवार यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थापक सचिव अतुल भांगे यांनी सर्व रक्तदाते, उपस्थित मान्यवर, वैद्यकीय पथक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी निस्वार्थ सेवा देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
