तेल्हारा : वीज वितरण कंपनी उपविभागीय कार्यालय शेगाव रोड, तेल्हारा अंतर्गत असलेल्या गजानन नगर परिसरातील नागरिक सध्या भीतीच्या छायेत दिवस काढत आहेत. कारण, ओपन स्पेसमध्ये उभारण्यात आलेल्या डीपीवरील उच्च दाबाची विद्युत वाहिनी अतिशय कमी उंचीवर असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
गजानन नगर येथील रावणकर गुरुजी यांच्या घरासमोरील ओपन स्पेसमध्ये मोठे मंदिर आणि त्याच्या परिसराला वॉल बाउंड्री बांधण्यात आलेली आहे. त्याच परिसरात एका कोपऱ्यात वीज वितरण कंपनीने डीपी उभारली आहे. या डीपीवरून गेलेली उच्च दाबाची वाहिनी थेट विलास घोडेस्वार यांच्या घरापर्यंत रोड क्रॉस करत जाते.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या वाहिनीवरील गार्डिंग वायर तुटलेली आहे. शिवाय, डीपीजवळील वडाच्या झाडातून गेलेली वायरिंग अतिशय कमी उंचीवर (सुमारे सात फुटांवर) आहे. त्यामुळे येथे सदैव खेळणाऱ्या लहान मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांची चिंता:स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार, “जर ही वायर खेळणाऱ्या मुलांच्या संपर्कात आली तर जीवघेणा अपघात होऊ शकतो. त्यामुळे वीज विभागाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.”
प्रशासनाचे लक्ष वेधले:या गंभीर धोक्याकडे लक्ष वेधून, गजानन नगर परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/auto-migrant-serious-wound/
