निंबा अंदुरा सर्कलमधील नया अंदुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान बहुउद्देशीय समितीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम राबवला आहे. या समितीच्या वतीने गरजू रुग्णाला थेट रक्तपुरवठा करण्याचा उपक्रम प्रथमच यशस्वीरीत्या राबवण्यात आला, त्यामुळे परिसरात या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
हाता येथील रहिवासी मंगला सुभाष दामोदर या विधवा महिला सध्या अकोला येथील श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या पतीने काही काळापूर्वी आत्महत्या केली असून त्या एकट्याच जीवनाशी झुंज देत आहेत. उपचारादरम्यान त्यांना तातडीने रक्ताची गरज भासली. अशा कठीण प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मेजर दिलीप सरदार यांनी तत्काळ पुढाकार घेतला आणि आवश्यक रक्तपुरवठा करून या महिलेला जीवनदायी मदत केली. आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत अडचणीत असलेल्या या महिलेसाठी प्रतिष्ठानचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने आधारवड ठरला आहे.
याशिवाय प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा आणखी एक महत्त्वाचा प्रसंग समोर आला आहे. वझेगाव येथील सत्यपाल अशोक वाघ यांचा बहादुरा फाट्याजवळ अपघात झाला होता. अपघाताची माहिती मिळताच मेजर दिलीप सरदार यांनी विलंब न करता १०८ आपत्कालीन सेवेवर संपर्क साधला, ॲम्बुलन्स त्वरित घटनास्थळी बोलावली आणि जखमी सत्यपाल वाघ यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविण्यास मदत केली. अशा प्रकारे अपघातग्रस्तांसाठीही प्रतिष्ठान नेहमीच सज्ज असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Related News
निंबा अंदुरा सर्कलमध्ये अशा प्रकारचे तत्काळ आणि प्रत्यक्ष मदतीचे काम करणारी ही पहिलीच समिती ठरली असून समाजात मानवतेचे आणि सहकार्याचे नवे उदाहरण प्रतिष्ठानने घालून दिले आहे. सामाजिक कार्य हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून ते साकार करता येते, हे मेजर दिलीप सरदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या मागे संपूर्ण समितीची भक्कम साथ असून त्यामुळेच हे उपक्रम यशस्वी होत आहेत.
प्रसारमाध्यमांबाबतही प्रतिष्ठानने एक वेगळा आणि सकारात्मक उपक्रम राबवला आहे. आजपर्यंत अनेक संघटनांनी पत्रकारांच्या कार्याकडे दुर्लक्ष केले असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानने निंबा अंदुरा सर्कलमधील सुमारे २२ पत्रकार बांधवांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला होता. हा उपक्रम परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला होता.
समाजप्रबोधन आणि युवकांना क्रीडेकडे वळवण्याच्या उद्देशाने प्रतिष्ठानने येत्या फेब्रुवारी महिन्यात कबड्डी स्पर्धांचे आयोजनही केले आहे. ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील कौशल्य विकसित व्हावे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
“समाजात अनेक घटना घडत असतात. अशा वेळी कुणालाही सहकार्याची गरज भासल्यास आमच्या समितीला निःसंकोच फोन करा. आम्ही कोणताही विचार न करता तिथे पोहोचू आणि शक्य ती सर्वतोपरी मदत करू,” असे आवाहन मेजर दिलीप सरदार यांनी अजिंक्य भारतशी बोलताना केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही असेच मानवतावादी उपक्रम राबवले जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
