राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाळापूर बाजार समितीत धरणे आंदोलन

राष्ट्रीय किसान मोर्चा

बाळापूर  – राष्ट्रीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिपक इंगळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५ डिसेंबर रोजी बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांतील आर्थिक व्यवहारांबाबत आवश्यक माहिती मिळावी, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान बाजार समितीच्या मागील पाच वर्षांच्या आर्थिक वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, तसेच सन २०२२ ते २०२५–२०२६ या कालावधीत आजपर्यंतच्या खरीप व रब्बी हंगामातील सर्व प्रकारच्या शेतमालाची आवक व विक्रीची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६१ मधील कलम २७-अनुसार दर सहा महिन्यांनी होणाऱ्या आर्थिक उलाढालीवरील विचार-विनिमयासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

यासोबतच FAQ व NON-FAQ अंतर्गत खरेदी केलेल्या शेतमालाची आकडेवारी, तसेच FAQ व NON-FAQ साठी लावण्यात आलेले निकष स्पष्ट करावेत, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली. शेतकऱ्यांशी संबंधित माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात बाजार समितीने टाळाटाळ केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Related News

या धरणे आंदोलनात राष्ट्रीय किसान मोर्चाचे बाळापूर तालुका अध्यक्ष गजानन जंजाळ, गोविंद दाभाडे, प्रशांत सरदार, बाळू लोधे, देवानंद अवचार, सिद्धार्थ वानखडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Related News