दहीहंडा पोलिसांची धडक कारवाई; ४२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

गुटखा जप्त

अकोट : जिल्ह्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत दहीहंडा पोलिसांनी गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी प्रभावी कारवाई करत ४२ हजारांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईत गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली असून एकूण १ लाख ७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दहीहंडा पोलीस स्टेशनला करतवाडी गावाकडून चोहोट्टा बाजारकडे दुचाकीवरून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दहीहंडा पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू करत चोहोट्टा बाजार–करतवाडी रस्त्यावरील टिपू सुलतान चौकात सापळा रचून नाकाबंदी केली.

नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या दुचाकीवरून येणाऱ्या इसमास पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली. तपासणीदरम्यान दुचाकीवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा आढळून आला. या प्रकरणात रेल (ता. अकोट) येथील रहिवासी श्याम भास्कर सुरतकार (वय अंदाजे) यास ताब्यात घेण्यात आले.

Related News

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार आरोपीकडून ४२ हजार ३४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तसेच यामाहा कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली. दुचाकीची किंमत अंदाजे ६५ हजार रुपये असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ७ हजार ३४० रुपये इतकी आहे.शासनाने आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेले तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध दहीहंडा पोलीस स्टेशन येथे विविध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व वाहतुकीविरोधात पुढील काळातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या कारवाईमुळे परिसरात अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून दहीहंडा पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/police-patil-sangathans-love-meeting-ends-with-great-enthusiasm/

Related News