संविधान प्रास्ताविकातून वाचन संस्कृतीचा संदेश ; टॉवर चौकात आगळा उपक्रम

संविधान प्रास्ताविका

अकोला : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अकोला शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी संघटनांच्या वतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. याच अनुषंगाने टॉवर चौकात तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, अजिंक्य भारत न्यूज आणि सम्यक संबोधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान प्रास्ताविक वाचन व पुस्तक प्रदर्शनाचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

भारतीय संविधानाचे प्रास्ताविक लिहिलेले फलक, विविध विषयांवरील पुस्तके आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश यामुळे हा उपक्रम नागरिकांचे लक्ष वेधून घेत होता. “वाचाल तर वाचाल” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा विचार कृतीतून साकार करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत संविधान वाचनाची गरज अधोरेखित केली. “संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते आपले सामाजिक व नैतिक मूल्य जपणारे मार्गदर्शक आहे. प्रत्येक नागरिकाने संविधान वाचले पाहिजे आणि त्यातील मूल्ये आत्मसात केली पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी केले.

Related News

हा उपक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक डॉ. सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून साकार झाला. यावेळी बोलताना डॉ.वाघमारे म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आज प्रत्येक नागरिकाला हक्क, स्वातंत्र्य आणि समानतेची हमी मिळाली आहे. मात्र संविधानाचे महत्त्व समजून घेण्यासाठी त्याचे वाचन आवश्यक आहे. वाचन संस्कृती टिकवणे ही काळाची गरज आहे.” त्यांनी युवक-युवतींना वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. सकाळपासूनच टॉवर चौकात गर्दी होत होती. अनेकांनी संविधान प्रास्ताविकाचे वाचन केले, पुस्तके पाहिली आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेषतः युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या उपक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले उमेश शिरसाट व त्यांच्या सहचारिणी श्वेता शिरसाट. त्यांच्या ऐतिहासिक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नागरिक, युवक व लहान मुले त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करताना दिसून आली. या माध्यमातून सामाजिक सुधारणांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला.

यावेळी ॲड.संजय सेंगर, प्रदीप अवचार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे संविधानाबाबत जनजागृती वाढते, असे मत व्यक्त केले. “प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता संविधान समजून घेण्याचा दिवस म्हणून साजरा व्हायला हवा,” असे मत वक्त्यांनी मांडले.

तिक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी, अजिंक्य भारत न्यूज व सम्यक संबोधी संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी या उपक्रमाला भेट देऊन आपले विचार मांडले आणि वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

एकूणच, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेला हा उपक्रम संविधानाचे महत्त्व, वाचनाची गरज आणि सामाजिक मूल्ये यांचा प्रभावी संदेश देणारा ठरला. अशा उपक्रमांमुळे संविधानाबद्दलची जाणीव अधिक व्यापक होऊन लोकशाही मूल्ये अधिक बळकट होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Related News