जि.प. शाळा लोहारी खु. येथे संविधान दिन उत्साहात साजरा

संविधान दिन

अकोट : अकोट पंचायत समिती अंतर्गत जि.प. व प्राथमिक शाळा लोहारी खु. येथे संविधान दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. विविध घोषणांनी दुमदुमलेल्या प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी गावातून काढलेल्या या फेरीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शाळेत झालेल्या मुख्य कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक नितीन धोरण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाची प्रस्तावना वाचून लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली.

कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी संविधान विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन, मानवी साखळी निर्मिती, संविधान सेल्फी पॉईंट, तसेच संविधानाच्या घटकांवर माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन अशा उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related News

यावेळी शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान निर्मितीतील भूमिकेवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता, मूलभूत हक्क व कर्तव्यांचे महत्त्व समजावून सांगितले. “संविधान हा देशाचा भक्कम पाया असून प्रत्येक नागरिकाने आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडणे आवश्यक आहे,” असा संदेश मुख्याध्यापकांनी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश वानखडे तर प्रमुख अतिथी म्हणून सुमेधा डोबाळे व भूजिंगराव इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रुपाली ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली निचळ यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नितीन धोरण, सोनाली उज्जैनकर, रुपाली ढवळे, सोनाली निचळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून संविधानाबद्दलची जागरूकता आणि बांधिलकी अधोरेखित केली.

read also : https://ajinkyabharat.com/negative-breaking-mumbai-construction-site-accident-u200bu200bjj-hospitalnear-horrific-accident-construction-mixer-krapoon-safety-engineer-seriously-injured/

Related News