CJP Protest : सरकारकडून CJP ची ‘ही’ मागणी मान्य; आता नड्डांच्या घरी चर्चेचा प्रश्नच मिटला, 24 जुलैला मोठी बैठक
नीट पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टी CJP च्या आंदोलनाला आता महत्त्वाचे वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि CJP यांच्यात चर्चेचे दरवाजे उघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चर्चेसाठी तटस्थ ठिकाण अर्थात ‘न्यूट्रल वेन्यू’ निवडण्याची मागणी सरकारने मान्य केल्याचा दावा CJPकडून करण्यात आला आहे.
CJPच्या माहितीनुसार, सरकार आणि आंदोलकांमध्ये आता 24 जुलै रोजी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकारच्या निवासस्थानी किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात चर्चा करण्याचा मुद्दा आता मागे पडला आहे. दोन्ही बाजूंमध्ये होणाऱ्या या बैठकीत CJP आपल्या चार प्रमुख मागण्या सरकारसमोर ठामपणे मांडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी या घडामोडीचे स्वागत केले आहे. “तटस्थ ठिकाणी चर्चा करण्याचा आमचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. आम्ही याचे स्वागत करतो. मात्र, आमच्या सर्व प्रमुख मागण्या पूर्वीप्रमाणेच ठामपणे सरकारसमोर मांडल्या जातील,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
Related News
CJPच्या प्रवक्त्या वैष्णवी गौर यांनीही सरकार तटस्थ ठिकाणी चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता 24 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
CJPच्या चार प्रमुख मागण्या काय?
CJPने सरकारसमोर चार प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे. याशिवाय परीक्षा अनियमिततेमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात यावी, निर्दोष आंदोलकांविरोधात दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि देशातील परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्यात याव्यात, या मागण्यांचाही समावेश आहे.
या चारही मागण्यांवर CJP ठाम असल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे 24 जुलैच्या चर्चेत सरकार या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांचे उपोषण सोडले
दरम्यान, या आंदोलनाचा प्रमुख चेहरा मानले जाणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 26 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर सोडले आहे. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी रात्री उशिरा त्यांची भेट घेतली.
या भेटीनंतर नड्डा यांच्या हस्ते ज्यूस पिऊन वांगचुक यांनी उपोषणाची सांगता केली. त्यांच्या उपोषणाच्या समाप्तीनंतर केंद्र सरकार आणि आंदोलकांमधील संघर्षाला काही प्रमाणात वेगळे वळण मिळाले आहे.
वांगचुक यांनी सरकारकडून काही महत्त्वाची आश्वासने मिळाल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर सरकारसोबत चर्चा केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणामुळे जीवन गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, अशी तीन आश्वासने सरकारकडून मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
वांगचुकांनी उपोषण सोडलं, पण CJPचं आंदोलन सुरूच
सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी CJPचे आंदोलन संपलेले नाही. CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी वांगचुक यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीन्यासह चारही प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“सोनम सरांनी त्यांचं उपोषण मागे घेतल्याने आम्हाला दिलासा मिळाला असून, आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या असामान्य धैर्याला आणि त्यागाला मनापासून सलाम,” अशी भावना अभिजीत दीपके यांनी व्यक्त केली.
मात्र, त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली आहे. वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेला लढा थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
24 जुलैच्या बैठकीत काय होणार?
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 24 जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत सरकार आणि CJP यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर सहमती होते. CJPने आपल्या चार मागण्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे सरकारने तटस्थ ठिकाणी चर्चेचा प्रस्ताव स्वीकारल्याने संवादाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर सरकारची भूमिका काय असेल, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत कोणता निर्णय होईल आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार कोणती ठोस पावले उचलणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
त्यामुळे सोनम वांगचुक यांच्या 26 दिवसांच्या उपोषणानंतर आता CJP आंदोलनाचा पुढील टप्पा 24 जुलैच्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. सरकार आणि आंदोलकांमधील ही चर्चा यशस्वी ठरते का, यावर आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.
