उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हाता गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोड्यांची मालिका राबवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दि. १६ जानेवारी रोजी रात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन घरे फोडून चोरट्यांनी सोने, चांदी व नगदी असा सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, गजबजलेल्या वस्तीतील घरेही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हाता येथील अनंता गोविंदराव कुचके यांच्या घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी घरातील जुनी तिजोरी उघडली. त्यातून सोने-चांदीचे दागिने व नगदी रक्कम मिळून सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
Related News
तसेच कांताबाई शालीकराम कुचके यांच्या घरातही घरफोडी करून सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याशिवाय बळीराम तळोकार यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बाळासाहेब धर्माळे यांच्या घराजवळील आरसीसी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीनंतर पळून जाण्यासाठी चोरट्यांनी गावातीलच दोन दुचाकींचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. गौतम दामोदर आणि गणेश सुरसकार यांच्या दुचाकी गाड्या घेऊन चोरटे हाता-फाटा परिसरापर्यंत गेले व नंतर त्या रोहनकार यांच्या शेतात सोडून देऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाले असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथक मोबाईल व्हॅनसह तसेच श्वान पथकही काही वेळात घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
हाता गावासारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. रात्री गस्त वाढवावी, तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घरफोडीतील चोरट्यांना जेरबंद करणे हे उरळ पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार असून, चोरीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कांईदे व इतर पोलिस कर्मचारी करत आहेत.
पोलीस लवकरच चोरट्यांचा छडा लावतील, असा विश्वास व्यक्त केला जात असला तरी, या घटनेने हाता गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/in-broad-daylight-from-a-scooter/
