अकोला पोलिसांची एकदिवसीय धडक कारवाई; ८४ केसेस, सुमारे ७.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला

अकोला : जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीच्या नेटवर्कवर अंकुश ठेवण्यासाठी अकोला पोलिस दलाने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एकदिवसीय विशेष मोहीम राबवली. पोलिस अधीक्षक  अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत ही कारवाई प्रभावीपणे पार पडली.

या मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या पथकांनी ८३ ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. या दरम्यान सुमारे ७,३३,२५० रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अवैध धंद्यात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही स्वतंत्रपणे एका ठिकाणी छापा टाकत मोठी कारवाई केली. येथे ०७ लिटर गावठी दारू आणि ३४० लिटर सडवा मोहमाद्रव्य, अंदाजे ५२,४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अशा प्रकारे एकूण ८४ केसेस दाखल करत अकोला पोलिसांनी एकूण ७,८५,६५० रुपयांचा अवैध दारूसाहित्य जप्त केला आहे.

Related News

अवैध गावठी दारू उत्पादनामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो आणि सामाजिक शांततेलाही बाधा पोहोचते. याच पार्श्वभूमीवर अकोला पोलिस दलाने कठोर पावले उचलत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई केल्याने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे.

अकोला जिल्हा पोलिसांनी पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर सतत आणि कठोर कारवाई सुरु ठेवण्याचा इशारा दिला आहे. तसेच, अवैध दारू उत्पादन किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जवळच्या पोलिस ठाण्यात तत्काळ कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

read  also : https://ajinkyabharat.com/bank-holiday-list-december-2025-know-how-many-days-banks-will-be-closed-in-december-as-per-rbi-rules-how-many-days-will-be-holidays-for-banks/

Related News