अकोला जिल्ह्यात रियल इस्टेट लिगल अवेअरनेस कार्यक्रम

रियल इस्टेट

अकोला जिल्ह्यात रियल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता, सुरक्षितता आणि कायदेशीर जनजागृती वाढविण्याच्या उद्देशाने भारतीय रियल इस्टेट सल्लागार एजंट वेलफेअर युनियन (भारत) यांच्या वतीने “रियल इस्टेट लिगल अवेअरनेस व संवाद कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कृषक भवन, मूर्तिजापूर मार्ग, स्टेडियमजवळ, पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला येथे पार पडणार आहे.

रियल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक, सल्लागार, एजंट, बिल्डर आणि डेव्हलपर यांना मालमत्तेशी निगडित कायदेशीर तरतुदी, दस्तऐवजीकरण प्रक्रिया तसेच सुरक्षित व्यवहारांबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता व्यवहारांमध्ये फसवणूक, अपूर्ण कागदपत्रे आणि कायदेशीर अडचणी यांसारख्या समस्या अनेकदा समोर येतात. या पार्श्वभूमीवर योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संवाद कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

कार्यक्रमात रियल इस्टेट व्यवहारांतील फसवणुकीपासून बचाव करण्याचे उपाय, कायदेशीर वाद टाळण्याचे मार्ग, नोंदणी प्रक्रिया, गुंतवणूक सुरक्षितता तसेच एजंट व सल्लागारांची भूमिका, त्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्र अधिक सुरक्षित, संघटित आणि पारदर्शक होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Related News

कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी ३ वाजता होणार असून आमदार रणधीर सावरकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर  शारदा खेळकर विशेष अतिथी तर जिल्हाधिकारी वर्षा मीना सन्माननीय अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहतील. नारेडको (NAREDCO) चे अध्यक्ष सुनील इंदानी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचा समारोप होणार असून खासदार अनुप धोत्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने हेही समारोप कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

रियल इस्टेट हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे क्षेत्र असून कायदेशीर माहितीअभावी अनेकदा वाद निर्माण होतात. त्यामुळे अशा जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि संघटनात्मक बळकटी निर्माण होईल, असे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील सर्व रियल इस्टेट व्यावसायिक, एजंट, सल्लागार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/income-tax-rules-2026-major-changes-related-to-tax-from-1st-april-pan-hra-cash-deposit-to-crypto-know-what-will-be-the-consequences-for-you/

Related News