सहजीवनाची प्रेरणादायी 44 वर्षे! ॲड. लखनसिंह कटरे आणि सौ. उषादेवी कटरे यांच्या यशस्वी संसाराचा गौरवशाली प्रवास
दोन व्यक्तींचे एकत्र येणे आणि आयुष्यभर सुख-दुःखात एकमेकांची साथ देत कुटुंब, समाज आणि मूल्यांचा वारसा जपणे हीच खऱ्या अर्थाने वैवाहिक जीवनाची खरी ओळख असते. आजच्या वेगवान आणि बदलत्या काळात विवाहसंस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना, काही जोडपी आपल्या आचरणातून या संस्थेची ताकद आणि सौंदर्य जपताना दिसतात. अशाच प्रेरणादायी दाम्पत्यांपैकी एक म्हणजे ॲड. लखनसिंह कटरे आणि सौ. उषादेवी कटरे. येत्या 2 जून रोजी त्यांचा 44 वा विवाह वर्धापनदिन साजरा होत असून, त्यांच्या सहजीवनाचा हा प्रवास अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.
2 जून 1982 रोजी दोन प्रतिष्ठित आणि संस्कारसंपन्न घराण्यांचे मिलन झाले. विवाहानंतर सौ. उषादेवी कटरे यांनी कटरे परिवारात गृहप्रवेश केला आणि त्यानंतर सुरू झाला सहकार्य, समर्पण आणि परस्पर विश्वासाचा प्रवास. सौ. उषादेवी यांची पार्श्वभूमी अत्यंत समृद्ध आहे. त्या छत्तीसगडमधील इंग्रजकालीन डेप्युटी डायरेक्टर ऑफ ॲग्रीकल्चर रायबहादूर स्वर्गीय टुंडीलाल पोवार तुरकर यांच्या नात तर स्वर्गीय यदुराजसिंह तुरकर यांच्या कन्या आहेत.
Related News
बी.ए. शिक्षण घेतलेल्या उषादेवी यांनी तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी आणि संस्कृत या विषयांचा सखोल अभ्यास केला. मात्र, केवळ शैक्षणिक पात्रतेपुरते न थांबता त्यांनी आपल्या पतीच्या प्रत्येक संघर्षात खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सहकार्यामुळेच ॲड. लखनसिंह कटरे यांचा प्रशासकीय आणि सामाजिक प्रवास अधिक सक्षम झाला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर लखनसिंह कटरे यांनी राज्याच्या सहकार विभागात जिल्हा सहकार निबंधक म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांच्या प्रामाणिक आणि निर्भीड कार्यशैलीमुळे त्यांची महाराष्ट्रभर विविध ठिकाणी बदली झाली. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी तत्त्वांशी तडजोड केली नाही.
संघर्षातून उभा राहिलेला आदर्श संसार; कटरे दाम्पत्याच्या 44 वर्षांना सलाम
सन 2006-07 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव येथे आठ वर्षांपासून बंद पडलेल्या जयकिसान साखर कारखान्याला पुन्हा सुरू करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांनी केली. कोल्हापूरच्या वारणा समूहाच्या सहकार्याने हा कारखाना 110 टक्के क्षमतेने सुरू करण्यात यश आले. याशिवाय एका मंत्र्यांच्या अनधिकृत कामाला नकार देत त्यांनी स्वखुशीने गडचिरोली येथे बदली स्वीकारली. प्रामाणिकपणा आणि नीतिमूल्ये जपणाऱ्या अधिकाऱ्याचा हा दुर्मिळ आदर्श मानला जातो.
प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना घराची संपूर्ण धुरा सौ. उषादेवी यांनी सांभाळली. पतीच्या कार्यपद्धतीबद्दल त्यांना सदैव अभिमान होता. त्यामुळे अनेक संघर्ष, बदल्या आणि आव्हाने आली तरी त्यांच्या संसाराची वीण अधिक मजबूत होत गेली.
2013 मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर हे दाम्पत्य आपल्या मूळ गावी परतले. निवृत्तीनंतरही त्यांनी समाजापासून दूर न जाता नव्या उमेदीने कार्य सुरू ठेवले. उषादेवी यांनी आपल्या वडिलांचा आणि आजोबांचा कृषी वारसा पुढे नेत गोंदिया जिल्ह्यातील बोरकन्हार येथे स्वतःच्या शेतात 60 हून अधिक जातींच्या आंब्यांची लागवड केली. आज ही आमराई परिसरातील आकर्षणाचा विषय ठरली आहे.
दुसरीकडे, लखनसिंह कटरे यांनी साहित्य क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या लेखणीतून आतापर्यंत 19 ग्रंथ प्रकाशित झाले असून आणखी सात पुस्तके प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या ‘जाणिवेतले कर्कदंश’ या काव्यसंग्रहातील ‘जागर’ ही कविता नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या बी.कॉम. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.
‘शाश्वत मौनाचे स्वगत’ या अभंगसंग्रहामुळे आधुनिक मराठी अभंग परंपरेतील महत्त्वाचे रचनाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. साहित्य, संस्कृती आणि लोकपरंपरा जपण्यासाठी त्यांनी विविध संस्थांमधून मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य, मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य, साहित्य अकादमीशी संलग्न कार्य तसेच अखिल भारतीय साहित्य परिषदेसह अनेक संस्थांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे.
त्यांच्या या यशामागे सौ. उषादेवी यांची मूक प्रेरणा कायम राहिली. प्रत्येक पुस्तकाच्या निर्मितीपासून ते प्रकाशनापर्यंत त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले. त्यामुळेच त्यांच्या सहजीवनात साहित्य आणि शेती यांचा सुंदर संगम दिसून येतो.
या दाम्पत्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ 2010 मध्ये आला. लखनसिंह कटरे यांना किडनीच्या कर्करोगाचे निदान झाले. गंभीर आजार, उपचार आणि त्यातून निर्माण झालेली मरणासन्न अवस्था यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. मात्र, या संकटसमयी सौ. उषादेवी यांनी अपार धैर्य दाखवले. पतीला पुन्हा निरोगी आयुष्य मिळावे यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले.
आई-वडिलांचा संघर्ष आणि परस्परांवरील प्रेम पाहून त्यांचा मुलगा ॲड. अनिकेतसिंह कटरे यानेही मोठा त्याग केला. कॉर्पोरेट क्षेत्रातील आकर्षक नोकरी सोडून तो गावी परतला आणि वडिलांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. त्याच्या अथक प्रयत्नांमुळे आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे लखनसिंह कटरे यांनी या आजारावर यशस्वी मात केली.
आज अनिकेतसिंह आधुनिक पद्धतीने शेती सांभाळत आहेत. कुटुंबातील सून ज्युनियर कॉलेजमध्ये व्याख्याता आहे, तर मुलगी पुण्यात कार्यरत असून जावई टीसीएसमध्ये उच्च पदावर काम करतात. मुलांमध्ये रुजवलेले संस्कार आणि कर्तव्यभावना हेच कटरे दाम्पत्याच्या यशस्वी गृहस्थाश्रमाचे सर्वात मोठे यश मानले जाते.
आजही ॲड. लखनसिंह कटरे सक्रिय आहेत. ते सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिवक्ता म्हणून न्यायालयीन कामकाज करतात. तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आणि निवृत्त अधिकारी संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सहभाग घेतात.
प्रेम, विश्वास, त्याग, संघर्ष आणि मूल्यांवर आधारित आयुष्य कसे जगावे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कटरे दाम्पत्य. त्यांच्या 44 व्या विवाह वर्धापनदिनानिमित्त समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे सहजीवन असेच निरोगी, आनंदी आणि प्रेरणादायी राहो, हीच सर्वांची सदिच्छा आहे.
