प्रशांत किशोर सुनेत्रा पवारांच्या भेटीला; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे रणनीतीकार होणार? मोठ्या राजकीय हालचालींना वेग
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नव्या राजकीय रणनीतीची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आगामी निवडणुका, पक्षाची संघटनात्मक बांधणी, जनमत सर्वेक्षण आणि राष्ट्रवादीची पुढील राजकीय दिशा यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रशांत किशोर यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देवगिरी बंगल्यावर प्रशांत किशोरांची सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांसोबत बैठक
मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत प्रशांत किशोर, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यात महत्त्वाची चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची आगामी निवडणूक रणनीती कशी असावी, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या पद्धती वापराव्यात आणि पक्षाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी कोणते निर्णय घ्यावेत, यावर विचारमंथन झाल्याची माहिती आहे.
Related News
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचा कार्यक्रमही प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांचा पक्षातील वाढता सहभाग राजकीय निरीक्षकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.
मात्र, प्रशांत किशोर यांची अधिकृतपणे राजकीय सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांवरून वाद
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या पक्ष संघटनेतील नियुक्त्यांवरून अंतर्गत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेला आव्हान देत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते.
फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड पक्षघटनेनुसार झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले.
दुसरीकडे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यातील संवाद कमी झाल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नसल्याने काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रशांत किशोरांची मदत?
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर पक्षाची नव्याने उभारणी करण्याचे मोठे आव्हान आहे. जनसामान्यांमध्ये पक्षाची प्रतिमा मजबूत करणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि आगामी निवडणुकांसाठी प्रभावी रणनीती आखणे यासाठी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांना पक्षाच्या रणनीतीसाठी जोडले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मे महिन्यातही प्रशांत किशोर यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, प्रशांत किशोर यांची अधिकृत नियुक्ती झाल्याचे त्यांनी नाकारले होते.
नरेश अरोरांनंतर प्रशांत किशोरांची एंट्री?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनीतीकार म्हणून डिझाइन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांनी काम पाहिले होते. राष्ट्रवादीच्या प्रचारात गुलाबी रंगाची थीम वापरण्याची कल्पना नरेश अरोरा यांच्या टीमची असल्याचे सांगितले जाते.
मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेते आणि नरेश अरोरा यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी दावा केला होता की, अजित पवार यांना डिझाइन बॉक्स कंपनीचे काँट्रॅक्ट रद्द करायचे होते. त्यानंतर जानेवारी 2026 मध्ये अजित पवार यांचे निधन झाले आणि मार्च 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने नरेश अरोरा यांच्या कंपनीचे काँट्रॅक्ट रद्द केले.
आता नरेश अरोरा यांच्यानंतर प्रशांत किशोर यांची रणनीतीकार म्हणून एंट्री होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रशांत किशोर कोण आहेत? देशातील अनेक नेत्यांसाठी केली रणनीतीची जबाबदारी
प्रशांत किशोर हे देशातील प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. अनेक मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांनी राजकीय पक्षांना सल्ला दिला आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रचार रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी अनेक राज्यांतील नेत्यांसाठी काम केले.
यामध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.
प्रशांत किशोर यांनी अनेक वेळा दावा केला आहे की, त्यांच्या रणनीतीमुळे देशातील अनेक नेते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले.
बिहारमध्ये राजकीय प्रवासाला नवी सुरुवात
राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर आता स्वतः सक्रिय राजकारणात उतरले आहेत. बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी बांकीपूर मतदारसंघातून विजय मिळवल्याची माहिती आहे.
या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 19 हजार 324 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे ही जागा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती.
आता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांची संभाव्य भूमिका काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रशांत किशोर खरोखरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रणनीतीकार बनले, तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचार आणि संघटनात्मक धोरणात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
