गर्भधारणेच्या गोळ्या देऊन महिलेचा जीव धोक्यात; स्त्रीरोगतज्ज्ञांविरुद्ध पिंजर येथील रुग्णाची चौकशीची मागणी
अकोला शहरातील एका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका विवाहित महिलेचा जीव धोक्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पिंजर (ता. बार्शीटाकळी) येथील मयूर गजानन गावंडे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे सविस्तर तक्रार दाखल करून संबंधित डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, मयूर गावंडे यांच्या पत्नी वर्षा गावंडे यांना यापूर्वी एक्टॉपिक प्रेग्नन्सी (फॅलोपियन ट्यूबमध्ये गर्भ राहणे) झाल्याचा इतिहास होता. ही बाब संबंधित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अवंती कंझरकर यांना पहिल्याच तपासणीवेळी स्पष्टपणे सांगण्यात आली होती. असे असतानाही गर्भधारणा निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली Urine Pregnancy Test (UPT), Beta-HCG चाचणी किंवा तातडीची सोनोग्राफी करण्याचे निर्देश देण्यात आले नाहीत, असा आरोप करण्यात आला आहे.
याउलट, गर्भधारणा निश्चित नसतानाच रुग्णाला गर्भवती समजून Ladyboon (Dydrogesterone 10 mg), Combidox-OD, LMF-9 आणि Emesys MD यांसारखी गर्भधारणेदरम्यान वापरली जाणारी औषधे मोठ्या प्रमाणात लिहून देण्यात आली व रुग्णालयातूनच त्यांची विक्री करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
Related News
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पूर्वी एक्टॉपिक प्रेग्नन्सी झालेल्या महिलेमध्ये पुन्हा त्याच प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तातडीने सोनोग्राफी करून गर्भाचे स्थान निश्चित करणे आवश्यक असताना तसे करण्यात आले नाही. उलट सोनोग्राफीसाठी उशिराची तारीख देण्यात आल्याने मौल्यवान वेळ वाया गेला, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, २९ मे रोजी मध्यरात्री वर्षा गावंडे यांना तीव्र पोटदुखी व असह्य वेदना सुरू झाल्या. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णाला कंझरकर हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यानंतर रुग्णाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथे करण्यात आलेल्या तपासणीत “Ruptured Ectopic Pregnancy” असल्याचे धक्कादायक निदान झाले. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटामध्ये सुमारे १६०० मिली रक्त व मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या आढळून आल्या. अंतर्गत रक्तस्रावामुळे रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. जीव वाचविण्यासाठी तातडीने रक्त चढवावे लागले तसेच शस्त्रक्रिया करून फॅलोपियन ट्यूब काढून टाकावी लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
योग्य वेळी आवश्यक तपासण्या व निदान झाले असते तर ही गंभीर परिस्थिती टाळता आली असती, असा दावा तक्रारदाराने केला आहे. डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे पत्नीचा जीव धोक्यात आला, कायमस्वरूपी शारीरिक नुकसान झाले आणि मानसिक आघात सहन करावा लागला, असेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, संबंधित रुग्णालयातील सर्व वैद्यकीय नोंदी जप्त करण्यात याव्यात, वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास डॉक्टरांची वैद्यकीय नोंदणी रद्द करण्यात यावी तसेच फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार मयूर गावंडे यांनी केली आहे.
या गंभीर तक्रारीमुळे अकोला जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणा याबाबत काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वर्षा गावंडे ह्या महिला रुग्ण माझ्याकडे आल्या होत्या,दिनांक 29 रोजी रात्री तीन वाजताच्या दरम्यान त्यांची अचानक तब्येत खालावली होती, तसा मला त्यांचा कॉल आला होता,रात्री माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना सांगितले की,,येथे सोनोग्राफी काढण्याची कोणती सुविधा नाही, त्यामुळे तुमचा पेशंट तुम्ही जीएमसीला हलवा,असे त्यांना मी सांगितले, मी कोणत्याही चुकीच्या गोळ्या दिल्या नाहीत, यामध्ये माझा कोणताही कसूर नाही, मी सर्व नियमाने उपचार केले
-डॉक्टर अवंती कंझरकर (अप्पलवार ), स्त्री रोग तज्ञ अकोला
मी गेल्या कित्येक वर्षापासून डॉक्टर अवंती कंझरकर यांच्याकडे मी इलाज करून घेते, डॉक्टरांनी मला यापूर्वी सोनोग्राफी काढण्याची कोणती सूचना दिली नव्हती, उलट त्यांनी मला गर्भ राहण्याच्या गोळ्या हायडोज दिल्या होत्या, त्या गोळ्या घेतल्यानंतर मला काही दिवसांनी खूप त्रास झाला, त्यांनी डॉक्टरांनी मला कोणत्याही तपासण्या करण्याच्या सांगितल्या नव्हत्या, त्यांनी मला सांगितलं की ह्या गोळ्या तुम्ही घ्या, आणि तुमची तब्येत बरी होईल, असे सांगितले होते, अचानकच दिनांक 29 रोजी माझी रात्री तीन वाजताच्या दरम्यान तब्येत खालावली, मी व माझे पती कंझरकर हॉस्पिटलमध्ये गेलो, मॅडमला भेटलो, प्रकृती चिंताजनक पाहून त्यांनी मला त्यांच्या दवाखान्यात थांबू दिले नाही, उलट मला त्या दवाखान्यातून काढून दिले आणि माझ्यावर उपचार केला नाही, किंवा कोणतेही मार्गदर्शन केले नाही, माझी तब्येत अत्यंत खालवली असून या बाबीला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर अवंती कंझरकर ह्याच आहेत, डॉक्टरांच्या बेरजबाबदारपणा असल्यामुळे माझी तब्येत खराब झाली, परिणामी याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या आहेत, माझ्या तक्रारीवरून संबंधित डॉक्टराविरुद्ध तातडीने कारवाई करावी,
-वर्षा मयूर गावंडे, राहणार पिंजर
