1150 कोटींचं कोकेन जप्त : भारतामध्ये अमली पदार्थांविरोधातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई गुजरातमध्ये पार पडली असून, या ऑपरेशननं संपूर्ण देश हादरला आहे. तब्बल 196 दिवसांचा सागरी प्रवास, 7 देश, 23 बंदरं आणि 1150 कोटी रुपयांचं कोकेन… या संपूर्ण घटनाक्रमाने अनेकांना सुपरहिट ‘पुष्पा’ चित्रपटाची आठवण करून दिली. मात्र हा कुठलाही चित्रपट नव्हता, तर भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलेलं एक भलंमोठं आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट होतं.
गुजरात ATS आणि भारतीय तटरक्षक दलाने संयुक्त कारवाई करत मुंद्रा बंदरात मोठा सापळा रचला आणि आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांचा प्लॅन उधळून लावला. या कारवाईत जहाजातून कोट्यवधींचं कोकेन जप्त करण्यात आलं असून, या प्रकरणामागे जागतिक स्तरावरील मोठं नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
ब्राझीलपासून भारतापर्यंतचा थरारक प्रवास
‘MV Europe’ नावाचं हे मालवाहू जहाज ब्राझीलमधून आपल्या प्रवासाला निघालं होतं. सुरुवातीला या जहाजानं साओ विंकेटे बंदरातून प्रवास सुरू केला. त्यानंतर अर्जेंटिना, उरुग्वे, पनामा, बहामा, डोमिनिकन रिपब्लिक आणि अमेरिकेसह अनेक देशांतील बंदरांमध्ये हे जहाज थांबत पुढे सरकत राहिलं.
Related News
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जहाजाने एकूण 23 बंदरं पार केली, तर काही ठिकाणी वारंवार थांबे घेतल्यामुळे 40 हून अधिक हालचालींची नोंद झाली. या संपूर्ण काळात जहाजावर अत्यंत गुप्त पद्धतीने कोकेनची वाहतूक सुरू होती.
विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जहाजात असूनही जगातील विविध बंदरांमधील सुरक्षा यंत्रणांना याची कोणतीही कल्पना आली नाही. त्यामुळे या रॅकेटचं नियोजन अत्यंत व्यावसायिक आणि हायटेक पद्धतीने करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे.
ATS च्या रडारवर आधीपासूनच जहाज
गुजरात ATS ला या जहाजाबाबत मागील वर्षीच गुप्त माहिती मिळाली होती. त्यावेळी कोकेनचं पॅकिंग सुरू असल्याचं इनपुट भारतीय यंत्रणांना मिळालं होतं. त्यानंतर ATS ने जहाजाच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यास सुरुवात केली.
196 दिवसांच्या या प्रवासादरम्यान जहाज कुठे थांबतंय, कोणत्या मार्गाने पुढे जातंय, कोणत्या बंदरात किती वेळ उभं राहतंय याची माहिती भारतीय तपास यंत्रणा सातत्याने गोळा करत होत्या.
यानंतर हे जहाज आशियाकडे वळलं. 19 मे रोजी जहाज मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदर परिसरात आलं. त्यानंतर 22 मे रोजी पाकिस्तानातील कासिम बंदरात ते पोहोचलं आणि अखेर 26 मे रोजी गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल झालं.
मुंद्रा बंदरात रंगला अंतिम थरार
मुंद्रा बंदरात या ऑपरेशनचा सर्वात नाट्यमय भाग घडला. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दुसरं एक जहाज बंदर परिसरात येणार होतं आणि त्यामध्ये कोकेनचा साठा ट्रान्सफर केला जाणार होता. भारत हा या ड्रग्ज नेटवर्कमधील फक्त एक ट्रान्झिट पॉइंट असू शकतो, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तटरक्षक दल आणि ATS च्या पथकाने जहाजाभोवती घेराव घालताच खलाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. पकड टाळण्यासाठी जहाजावरील काही सदस्यांनी कोकेनने भरलेल्या पिशव्या थेट समुद्रात फेकण्यास सुरुवात केली.
मात्र सुरक्षा यंत्रणांनी वेगाने कारवाई करत समुद्रातून पाच पिशव्या हस्तगत केल्या. या पिशव्यांमध्ये तब्बल 115 पाकिटं कोकेनची होती. प्राथमिक अंदाजानुसार या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1150 कोटी रुपये इतकी आहे.
इंजिन रुममध्ये लपवला होता माल
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
या प्रकरणात दक्षिण अमेरिका, अमेरिका आणि आशियातील काही देशांतील गुन्हेगारी टोळ्यांचा सहभाग असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोकेनचा अंतिम बाजार भारत नव्हता, तर इतर आशियाई देशांमध्ये त्याची डिलिव्हरी होणार होती, अशीही शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली.
सध्या जहाजावरील खलाशांची चौकशी सुरू असून, अनेक डिजिटल पुरावे, सॅटेलाइट लोकेशन डेटा आणि शिपिंग डॉक्युमेंट्स तपासले जात आहेत.
भारतातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक
गुजरात ATS आणि भारतीय तटरक्षक दलाच्या या कारवाईकडे भारतातील सर्वात मोठ्या अँटी-ड्रग ऑपरेशन्सपैकी एक म्हणून पाहिलं जात आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या तस्करीविरोधात भारतीय यंत्रणा किती सजग आहेत, याचं हे मोठं उदाहरण मानलं जात आहे.
या कारवाईनंतर देशातील सर्व बंदरांवर सुरक्षा अधिक कडक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, आंतरराष्ट्रीय जहाजांच्या तपासणी प्रक्रियेतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
