इंधन आहे की नाही? छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचा साठा किती? आकडेवारी आली समोर
राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहेत. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो पेट्रोल’, ‘नो डिझेल’चे बोर्ड झळकत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार शहरात मोठ्या प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे “इंधन आहे तरी कुठे?” असा संतप्त सवाल नागरिक आणि शेतकरी उपस्थित करत आहेत.
22 मे 2026 रोजीच्या स्टॉक रिपोर्टनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा एकूण साठा 21 लाख 78 हजार लिटर इतका होता. त्यापैकी 6 लाख 61 हजार लिटर पेट्रोलची विक्री झाली असून सध्या 15 लाख 17 हजार लिटर पेट्रोल शिल्लक असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याशिवाय 7 लाख 65 हजार लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Related News
अभिजित दीपकेंचे Instagram हॅक? ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची Website डाउन; सोशल मीडियावर खळबळ
मोठा विजय! ट्रम्पचा 1 जबरदस्त डाव, इराणची मोठी माघार, जगासाठी दिलासादायक
-
By
Vivek Raut
मणिपूरमध्ये सुरक्षा दलांचा मोठा स्ट्राईक! 67 लुटलेली शस्त्रे जप्त, UNLF(P) चे 4 उग्रवादी अटकेत
Ratnagiri Crime: 33 वर्षीय बँक कर्मचाऱ्याची धक्कादायक बेपत्ता घटना; 4 पानी पत्रात चौघांवर गंभीर आरोप
50 मिनिटे विमान थांबले; इंडिगो पायलटच्या सतर्कतेचे देशभर कौतुक
-
By
Vivek Raut
Karishma Tanna च्या डोहाळे जेवणाची खास झलक; म्हणाली – “स्वप्न जगत असल्यासारखं वाटतंय”
संभाजीनगरमध्ये 7 लाख लिटर पेट्रोल ट्रान्झिटमध्ये, तरी वाहनचालक त्रस्त
डिझेलबाबतही अशीच आकडेवारी समोर आली आहे. शहरात 25 लाख 80 हजार लिटर डिझेल साठा उपलब्ध होता. त्यातील 12 लाख 72 हजार लिटर डिझेलची विक्री झाली असून 13 लाख 8 हजार लिटर डिझेल शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच 12 लाख 55 हजार लिटर डिझेल ट्रान्झिटमध्ये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ही आकडेवारी पाहता शहरात इंधनाचा मोठा साठा उपलब्ध असल्याचे चित्र दिसते. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी वाहनचालकांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहूनही इंधन मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
विशेषतः शेतकरी वर्ग यामुळे सर्वाधिक त्रस्त झाला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या कामांना वेग आला असताना डिझेलअभावी अनेक कामे ठप्प पडत आहेत. ट्रॅक्टर, पंपसेट आणि इतर कृषी यंत्रणा चालवण्यासाठी डिझेल अत्यावश्यक असते. मात्र अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील साजापूर परिसरात अनेक शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपांवर दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. “प्रशासन सांगते डिझेल उपलब्ध आहे, मग आम्हाला का मिळत नाही?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. काही शेतकऱ्यांनी तर शेती पडीक ठेवण्याची वेळ आल्याची खंत व्यक्त केली.
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पंपांवर डिझेल मिळत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर डिझेल उपलब्ध असेल तर ते नेमकं कुठे आहे?” असा संतप्त सवाल शेतकरी आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर आता राजकारणही तापू लागले आहे. एमआयएमचे नगरसेवक कुणाल राऊत यांनीही या परिस्थितीवर सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वाहनचालकाला डिझेल भरण्यासाठी जवळपास दोन तास रांगेत उभे राहावे लागले. दीर्घ प्रतीक्षेनंतर डिझेल मिळाले, असे त्यांनी सांगितले.
एमआयएमचे नगरसेवक कुणाल राऊत यांनी इंधन टंचाईच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सामान्य जनता पेट्रोल आणि डिझेलसाठी तासन्तास रांगेत उभी आहे. महागाईमुळे आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले असून गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असे राऊत म्हणाले. त्यांच्या मते, मूलभूत गरजांसाठी लोकांना संघर्ष करावा लागत असेल तर ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
सध्या संभाजीनगरमधील परिस्थिती पाहता प्रशासनाने केवळ आकडेवारी जाहीर न करता प्रत्यक्षात इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण कागदावर लाखो लिटर इंधन शिल्लक असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नागरिक आणि शेतकरी रांगेत उभे राहत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, इंधन वाहतुकीतील अडथळे, पुरवठा साखळीतील समस्या आणि वाढती मागणी यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी. मात्र प्रशासनाने वेळेत योग्य नियोजन केले नाही तर आगामी काळात ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
पेरणीचा हंगाम जवळ आल्याने ग्रामीण भागात डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांनीही कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
एकीकडे आकडेवारीत इंधन मुबलक असल्याचा दावा आणि दुसरीकडे पंपांवरील लांबच लांब रांगा, या विरोधाभासी परिस्थितीमुळे संभाजीनगरमध्ये इंधन संकटाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.