ऑनलाइन औषध विक्री, ई-फार्मसी आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींच्या विरोधात आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील केमिस्टांनी एकदिवसीय बंद पुकारला. या आंदोलनाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारो मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. परिणामी अनेक ठिकाणी रुग्णांना औषधे मिळण्यात अडचणी आल्या असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनानंतर हा बंद पुकारण्यात आला होता. देशभरातील सुमारे 12 लाख औषध विक्रेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याचा दावा संघटनांकडून करण्यात आला आहे.
सोलापुरात भव्य मोर्चा
सोलापुरात हुतात्मा स्मारकापासून औषध विक्रेत्यांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. काळ्या फिती बांधून आणि सरकारविरोधी घोषणाबाजी करत केमिस्टांनी संताप व्यक्त केला. माढा तालुक्यातील सुमारे 600 तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 8500 हून अधिक मेडिकल दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग घेतला.
Related News
करमाळ्यातही औषध विक्रेते आक्रमक झाले होते. “मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप करू,” असा इशारा संघटनांनी दिला. मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी दोन मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यात आली होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 100 टक्के बंद
पुण्यातील रास्ता पेठ परिसरातील पावर हाऊस चौकात औषध विक्रेत्यांनी आंदोलन केले. ऑनलाइन औषध विक्री आणि मोठ्या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात मेडिकल बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील जवळपास सर्वच मेडिकल दुकाने बंद होती. मात्र आपत्कालीन सेवेसाठी काही ठिकाणी औषधांची व्यवस्था करण्यात आली होती.
सांगलीत रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप
सांगली जिल्ह्यात 4 हजारांहून अधिक मेडिकल दुकाने बंद राहिल्याने रुग्णांना मोठा फटका बसला. विशेषतः सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील मेडिकल दुकाने बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी भटकंती करावी लागली. अनेकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
कोल्हापूर आणि साताऱ्यात मूक मोर्चे
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. हजारो औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावत आंदोलनात सहभाग घेतला.
साताऱ्यातील कराड शहरातही औषध विक्रेत्यांनी मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील 3200 हून अधिक घाऊक आणि किरकोळ विक्रेते संपात सहभागी झाले होते.
नंदुरबार, नाशिक आणि जळगावातही तीव्र आंदोलन
नंदुरबारमध्ये ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात आल्याचा आरोप करत मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
नाशिकच्या येवला भागात मेडिकल बंदमुळे रुग्णांना माघारी परतावे लागले. जळगावमध्ये औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ऑनलाइन औषध विक्रीच्या निर्णयाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली.
ठाणे, नागपूर आणि अमरावतीत निदर्शने
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर औषध विक्रेत्यांनी जोरदार आंदोलन केले. कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या होम डिलिव्हरीच्या नियमांचा ऑनलाइन कंपन्या गैरवापर करत असल्याचा आरोप संघटनांनी केला.
नागपूरमध्ये संविधान चौकात काळ्या फिती बांधून निदर्शने करण्यात आली. जवळपास 7 हजार औषध विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. मात्र काही नामांकित फार्मसी रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आल्या होत्या.
अमरावतीत मेडिकल दुकाने मध्यरात्रीपासूनच बंद होती. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकारला इशारा देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्येही बंद
छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार चौकासह जिल्ह्यातील सर्व मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली. जालन्यात 2000 पेक्षा अधिक मेडिकल चालकांनी संपात सहभाग घेतला.
बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात 300 हून अधिक मेडिकल चालकांनी बंदमध्ये सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
कोकणात 4000 मेडिकल दुकाने बंद
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेडिकल दुकाने बंद राहिली. रत्नागिरी जिल्ह्यातील 750 हून अधिक मेडिकल स्टोअर्स बंद असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात अलिबाग, महाड, पेन, माणगाव, रोहा यासह अनेक शहरांमध्ये मेडिकल सेवा ठप्प झाली होती.
केमिस्टांच्या प्रमुख मागण्या काय?
औषध विक्रेत्यांनी सरकारकडे काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
- ऑनलाइन औषध विक्रीवर तातडीने कठोर नियंत्रण
- ई-फार्मसीसाठी स्पष्ट नियमावली लागू करणे
- बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कारवाई
- कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवास्तव डिस्काउंटला आळा
- कोरोना काळातील होम डिलिव्हरी अध्यादेश रद्द करणे
संघटनांच्या मते, ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून ग्राहकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.
पुढील आंदोलनाचा इशारा
आजचा बंद हा केवळ लाक्षणिक आंदोलन असल्याचे सांगत संघटनांनी सरकारला इशारा दिला आहे. जर मागण्यांची दखल घेतली नाही, तर भविष्यात बेमुदत संप आणि देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा औषध विक्रेत्यांनी दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/with-one-word-from-qatar-trump-stepped-back/
