नांदेड हादरलं! मेव्हण्याच्या लग्नात पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; 3 चिमुकली मुलं झाली पोरकी

पत्नीची हत्या

नांदेड : राज्यात दिवसेंदिवस कौटुंबिक वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मेव्हण्याच्या लग्नासाठी आनंदात सासरवाडीत आलेल्या जावयाने मध्यरात्री पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तीन लहान मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

ही हृदयद्रावक घटना हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मृत महिलेचं नाव पायल विनोद राठोड (वय 35) तर मृत पतीचं नाव विनोद रंगराव राठोड (वय 40, रा. धारजणी फुलवाडी तांडा, ता. भोकर) असं आहे.

लग्नसमारंभात आनंदात वावरत होते दाम्पत्य

मिळालेल्या माहितीनुसार, पायल आणि विनोद राठोड हे आपल्या तीन मुलांसह नातेवाईकांच्या लग्नासाठी बोरगडी तांडा येथे आले होते. मेव्हण्याच्या लग्नाचा आनंद असल्याने संपूर्ण कुटुंब उत्साहात सहभागी झालं होतं. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, दोघंही दिवसभर आनंदात वावरत होते. कुठल्याही प्रकारचा वाद किंवा तणाव असल्याचं बाहेरून तरी जाणवत नव्हतं.

Related News

मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, विनोद राठोड याने पत्नी पायल हिला घराबाहेर बोलावलं. त्यानंतर काही अंतरावर नेत तिच्यावर धारदार चाकूने सपासप वार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गंभीर जखमी झालेल्या पायलचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सकाळी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती फरार झाला होता. दरम्यान, बुधवारी सकाळी धानोरा शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत विनोद राठोड याचा मृतदेह आढळून आला. ही माहिती गावात पसरताच मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पत्नीची हत्या केल्यानंतर भीतीपोटी विनोदने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

तीन चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर

या घटनेत सर्वात मोठं नुकसान झालं ते या दाम्पत्याच्या तीन लहान मुलांचं. एका रात्रीत आई-वडील दोघांनाही गमावल्याने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांकडून मुलांचा सांभाळ करण्यात येत असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.स्थानिकांच्या मते, राठोड कुटुंब सामान्य परिस्थितीत जीवन जगत होतं. त्यामुळे अचानक घडलेल्या या घटनेने सर्वजण हादरले आहेत. कौटुंबिक वाद, मानसिक ताण किंवा इतर कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वैजंने, पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासह पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. तसेच पोलीस पाटील चक्रधर काईतवाड, निकेश राठोड, संदेश तुळशे आणि गावातील सरपंच यांनीही घटनास्थळी भेट दिली.पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. घटनास्थळावरून काही पुरावेही जप्त करण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास हिमायतनगर पोलीस करत आहेत.

नांदेडमध्ये वाढत्या गुन्हेगारीने चिंता

दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अलिकडच्या काळात कौटुंबिक अत्याचार, आत्महत्या आणि हत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अर्धापूर तालुक्यातही एका विवाहित तरुणीने भावाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या या दुहेरी मृत्यू प्रकरणामागील खरं कारण काय, पती-पत्नीमध्ये नेमका कोणता वाद होता आणि अचानक अशी टोकाची घटना का घडली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Related News