समाजवादी पक्षाचे प्रमुख Akhilesh Yadav यांच्या कुटुंबातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ Prateek Yadav यांचे बुधवारी लखनऊ येथे निधन झाले. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे यादव कुटुंबासह समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रतीक यादव हे Mulayam Singh Yadav आणि त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे धाकटे पुत्र होते. तसेच ते Aparna Yadav यांचे पती होते. यादव कुटुंबातील इतर सदस्य सक्रिय राजकारणात असताना प्रतीक यांनी मात्र व्यवसाय क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोग्य समस्यांनी त्रस्त होते. त्यांना लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना यकृत आणि फुफ्फुसांशी संबंधित समस्या होत्या. याआधीही त्यांना उपचारासाठी अनेक वेळा मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Related News
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच यादव कुटुंबीय, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये दुःखाची लाट पसरली. अनेक राजकीय नेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली.
पोस्टमॉर्टम हाऊसला भेट दिल्यानंतर अखिलेश यादव यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत भावूक प्रतिक्रिया दिली. त्यांनी प्रतीक यादव यांना “खूप चांगला मुलगा” असे संबोधले. ते कुटुंबासाठी समर्पित होते आणि स्वतःच्या व्यवसायात नेहमी व्यस्त राहत असत, असे त्यांनी सांगितले. अखिलेश यादव म्हणाले की, सुमारे दोन महिन्यांपूर्वी त्यांची प्रतीक यांच्याशी भेट झाली होती आणि त्यावेळी त्यांनी आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला होता.
व्यवसायातील चढ-उतारांमुळे मानसिक ताण निर्माण होऊ शकतो, याचाही उल्लेख अखिलेश यादव यांनी केला. त्यांनी सांगितले की, या कठीण प्रसंगी संपूर्ण यादव कुटुंब एकत्र उभे आहे. पुढील सर्व निर्णय कुटुंबाच्या संमतीनेच घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रतीक यादव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या समोर आलेले नाही. KGMU डॉक्टरांच्या पॅनेलमार्फत त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे. या प्रक्रियेचे व्हिडिओग्राफीकरण करण्यात येत असून पोस्टमॉर्टम हाऊस परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, प्रतीक यादव यांच्या फिटनेस जीवनशैलीबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. ते फिटनेसप्रेमी होते आणि लखनऊमध्ये त्यांचा जिम व्यवसाय होता. जिम, बॉडीबिल्डिंग आणि फिटनेसबाबत ते खूप जागरूक होते. काही सूत्रांच्या मते, कठोर वर्कआउट रूटीन आणि विविध औषधांच्या वापराबाबत चर्चा सुरू होती. मात्र यासंदर्भात डॉक्टर किंवा कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
प्रतीक यादव यांनी युनायटेड किंगडममधील लीड्स विद्यापीठातून MBA चे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी राजकारणाऐवजी रिअल इस्टेट आणि फिटनेस उद्योगात करिअर घडवण्याचा मार्ग निवडला. यादव कुटुंबातील सदस्य असूनही त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा राजकीय पद स्वीकारले नाही.
2017 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितले होते की, त्यांना राजकारणात येण्याची इच्छा नाही आणि ते व्यवसायावरच लक्ष केंद्रित करणार आहेत. मात्र वेळोवेळी त्यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चाही रंगत होत्या. तरीही त्यांनी कायम राजकारणापासून अंतर राखले.
आज त्यांच्या निधनानंतर अनेकांना प्रश्न पडत आहे की, फिटनेस आणि शिस्तबद्ध जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तीचा इतक्या कमी वयात मृत्यू कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून लखनऊमध्ये शोकाकुल वातावरण पाहायला मिळत आहे.
