BJP Politics: राज ठाकरेंना भिडलेला नेता अचानक साईडलाईन? अण्णामलाईंच्या राजकीय प्रवासाची मोठी चर्चा
चेन्नई : राजकारणात प्रत्येक निवडणूक नवीन चेहरे घडवते आणि काही चेहऱ्यांना अचानक मागेही टाकते. काही वर्षांपूर्वी तमिळनाडूत भाजपचा सर्वात आक्रमक, चर्चित आणि लोकप्रिय चेहरा म्हणून के. अण्णामलाई यांच्याकडे पाहिलं जात होतं. सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग, तरुणांमध्ये लोकप्रियता आणि विरोधकांवर थेट हल्ला ही त्यांची खास ओळख बनली होती. मात्र २०२६ च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीनंतर अण्णामलाई अचानक मुख्य प्रवाहातून गायब झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अण्णामलाई यांनी थेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून टीका केली होती. त्या वेळी महाराष्ट्रातही त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. दादरमधील सभेत राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा “रसमलाई” असा उल्लेख करत टोला लगावला होता. या वादामुळे अण्णामलाई राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले होते.
मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. तमिळनाडूत भाजपनं विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुकसोबत युती करत निवडणूक लढवली आणि पक्षानं अण्णामलाईंना केंद्रस्थानी न ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे २०२६ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात आली नाही. भाजपच्या प्रचार मोहिमेतही त्यांची भूमिका मर्यादित ठेवण्यात आली.
Related News
IPS अधिकारी ते भाजपचा स्टार चेहरा
के. अण्णामलाई यांनी ऑगस्ट २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी ते कर्नाटक कॅडरचे IPS अधिकारी होते. कठोर, प्रामाणिक आणि धाडसी अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा होती. पोलीस सेवेतून बाहेर पडत त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली आणि भाजपनं त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांना तमिळनाडू भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. कारण पारंपरिक नेत्यांना डावलून भाजपनं एका नवख्या चेहऱ्यावर मोठा डाव खेळला होता.
अण्णामलाई यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सोशल मीडिया, रोड शो, थेट जनसंवाद आणि आक्रमक भाषणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. त्यांनी द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत हल्लाबोल केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
आक्रमक शैली ठरली अडचण?
अण्णामलाईंची शैली भाजपच्या पारंपरिक युतीच्या राजकारणापेक्षा वेगळी होती. त्यांनी तमिळनाडूत भाजप स्वतंत्रपणे मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे अण्णाद्रमुकसोबतचे संबंध ताणले गेल्याचं बोललं जातं.
अण्णाद्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांवर त्यांनी केलेली टीका पक्षाला खटकत होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि अण्णाद्रमुक युती तुटण्यामागे अण्णामलाईंची आक्रमक वक्तव्ये मोठं कारण मानली गेली. त्यानंतर भाजपला तमिळनाडूत फारसं यश मिळालं नाही.
अण्णामलाई यांनी कोईम्बटूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. प्रचारात मोठी हवा निर्माण झाली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर तमिळनाडूत युतीशिवाय भाजपला मोठं यश मिळवणं कठीण असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं.
भाजपची रणनीती बदलली?
२०२५ नंतर भाजपनं तमिळनाडूत आपली रणनीती बदलल्याचं स्पष्ट दिसू लागलं. पक्षानं अण्णामलाई यांच्या जागी नैनार नागेंद्रन यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यामागचं मुख्य कारण म्हणजे अण्णाद्रमुकसोबत पुन्हा संबंध सुधारण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
२०२६ विधानसभा निवडणुकीत भाजपनं युतीला प्राधान्य दिलं. अण्णाद्रमुकसोबत हातमिळवणी करत पक्षानं निवडणूक लढवली. निकालात भाजपला केवळ १ जागा मिळाली, तर अण्णाद्रमुकला ४७ जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षानं १०८ जागा जिंकत सर्वांचं लक्ष वेधलं.
या निकालानंतर अण्णामलाई यांनी विजय आणि त्यांच्या पक्षाचं अभिनंदन केलं. मात्र स्वतः मात्र निवडणुकीच्या मुख्य चर्चेत कुठेच दिसले नाहीत.
भाजपमध्ये अण्णामलाईंचं भविष्य काय?
राजकीय वर्तुळात आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अण्णामलाईंचं पुढचं राजकीय भविष्य काय असणार? भाजप त्यांना पुन्हा मोठी जबाबदारी देणार का? की पक्ष यापुढेही युतीच्या राजकारणालाच प्राधान्य देणार?
अण्णामलाई समर्थकांचं म्हणणं आहे की त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. तमिळनाडूसारख्या राज्यात भाजप मजबूत करण्यासाठी दीर्घकालीन रणनीतीची गरज होती. मात्र पक्षानं तातडीच्या निवडणूक गणितासाठी युतीचा मार्ग निवडला.दुसरीकडे काही विश्लेषकांच्या मते, अण्णामलाईंची आक्रमक शैली आणि स्वतंत्र भूमिका भाजपच्या व्यापक रणनीतीत बसत नव्हती. त्यामुळे पक्षानं त्यांना साईडलाईन करत युतीच्या राजकारणाला महत्त्व दिलं.
एकेकाळी तमिळनाडू भाजपचा ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अण्णामलाई आज राजकीय केंद्रस्थानी नसल्याचं चित्र आहे. मात्र त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि जनसंपर्क कौशल्यामुळे ते पुन्हा मोठ्या भूमिकेत दिसू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
