मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन सेवा मंगळवारी एका गंभीर दुर्घटनेपासून थोडक्यात बचावली. दुपारच्या गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर दोन लोकल ट्रेन समोरासमोर आल्याने काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मोटरमनच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य मोठा अपघात अवघ्या 130 मीटर अंतरावर टळला आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरहून येणारी जलद लोकल दुपारी 3.18 वाजता नियोजनानुसार प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येणे अपेक्षित होते. मात्र, सिग्नल यंत्रणेत झालेल्या गंभीर त्रुटीमुळे या लोकलला प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर जाण्याचा सिग्नल देण्यात आला. त्याच वेळी त्या प्लॅटफॉर्मवर खोपोलीहून आलेली लोकल उभी होती. परिणामी, काही क्षणांसाठी दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या आणि मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली.
CSMT सारख्या व्यस्त स्थानकावर गाड्यांच्या हालचाली अत्यंत काटेकोर सिग्नल प्रणालीवर आधारित असतात. यात होम सिग्नल, इनर होम सिग्नल आणि प्लॅटफॉर्म सिग्नल अशा टप्प्यांतून ट्रेनला मार्ग दिला जातो. मात्र, या प्रक्रियेत झालेल्या एका चुकीमुळे संपूर्ण यंत्रणा गोंधळात पडली.
Related News
बदलापूर लोकलने प्लॅटफॉर्म 5 चा होम सिग्नल पार केला होता. मात्र पुढील इनर होम सिग्नल लाल असल्याचे मोटरमनच्या लक्षात येताच त्याने तात्काळ ब्रेक लावले. त्या क्षणी समोर उभी असलेली खोपोली लोकल अवघ्या 130 मीटर अंतरावर होती. जर काही सेकंदांचा विलंब झाला असता, तर गंभीर अपघात अटळ होता.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित स्टेशन मास्तरला निलंबित केले आहे. तसेच, या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात मानवी चुकीमुळे हा गोंधळ झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या घटनेचा परिणाम संपूर्ण स्थानकावर दिसून आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 5, 6, 7 आणि 8 वर सुमारे 25 मिनिटे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या अनेक गाड्या सिग्नलवर अडकल्या. परिणामी, प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
सायंकाळच्या गर्दीच्या वेळी हा परिणाम अधिक जाणवला. अनेक गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत रेल्वे प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले.
मुंबई लोकल सेवा दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. विशेषतः सिग्नल प्रणालीतील त्रुटी आणि मानवी चुका यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षा प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.तज्ज्ञांच्या मते, आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून सिग्नल प्रणाली अधिक सुरक्षित आणि स्वयंचलित करणे आवश्यक आहे. मानवी हस्तक्षेप कमी करून ऑटोमेशन वाढवले, तर अशा चुका टाळता येऊ शकतात.दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
