LPG Cylinder Booking: योग्य वेळेत बूक करा सिलेंडर; टाळा अडचणी, जाणून घ्या सोपी ट्रिक
मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि जागतिक इंधन पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे भारतातही LPG सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चर्चा वाढल्या आहेत. अनेक ग्राहक अचानक सिलेंडर बूक करण्याचा प्रयत्न करत असल्याने गॅस कंपन्यांच्या ऑनलाइन सर्व्हरवर ताण वाढला आहे. परिणामी, बुकिंग करताना तांत्रिक अडचणी, विलंब किंवा बुकिंग फेल होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मात्र घाबरण्याचे कारण नसून, सरकार आणि गॅस कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की देशात LPG पुरवठा सुरळीत आहे आणि कमतरतेची कोणतीही अधिकृत माहिती नाही.
सिलेंडर बुक करण्याची सर्वोत्तम वेळ
तज्ज्ञ आणि विविध माध्यमांच्या रिपोर्टनुसार, संध्याकाळी 6 नंतर LPG सिलेंडर बूक करणे अधिक सोयीचे ठरते. या वेळेत ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील ट्रॅफिक तुलनेने कमी असतो. दिवसभर मोठ्या प्रमाणात ग्राहक बुकिंग करत असल्याने सर्व्हरवर दबाव वाढतो, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत बुकिंग केल्यास प्रक्रिया जलद पूर्ण होण्याची शक्यता असते.
रात्री केलेली बुकिंग कधी प्रोसेस होते?
जर ग्राहकांनी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बुकिंग केली, तर ती बुकिंग साधारणपणे सकाळी 6 नंतर प्रोसेस केली जाते. त्यामुळे रात्री बुकिंग करताना तात्काळ कन्फर्मेशन मिळत नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही.
e-KYC आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर महत्त्वाचा
सिलेंडर डिलिव्हरीसाठी e-KYC पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. जर ग्राहकाने e-KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर वितरक डिलिव्हरी रोखू शकतो. याशिवाय गॅस कनेक्शनशी जोडलेला नोंदणीकृत मोबाईल नंबर सक्रिय ठेवणे आवश्यक आहे, कारण बुकिंग आणि डिलिव्हरी संदर्भातील सर्व मेसेज याच नंबरवर पाठवले जातात.
WhatsApp द्वारेही बुकिंगची सुविधा
आजकाल ग्राहकांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी WhatsApp द्वारे सिलेंडर बुकिंगची सुविधा देण्यात आली आहे. ग्राहकांनी 7588888224 या नंबरवर “REFILL” असा मेसेज पाठवून बुकिंग करू शकतात.
25 दिवसांचा नियम लक्षात ठेवा
गॅस कंपन्यांच्या नियमानुसार, ग्राहकांना मागील सिलेंडरची डिलिव्हरी झाल्यानंतर 25 दिवसांच्या आत नवीन सिलेंडर बुक करता येत नाही. हा नियम विशेषतः अनावश्यक आणि घाईघाईने होणाऱ्या पॅनिक बुकिंगला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आला आहे. अनेकदा पुरवठ्याबाबत अफवा किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्यावर ग्राहक वारंवार सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बुकिंग सिस्टीमवर ताण वाढतो आणि खरोखर गरज असलेल्या ग्राहकांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
त्यामुळे सर्व ग्राहकांना समान व नियोजनबद्ध सेवा मिळावी, तसेच गॅसचा पुरवठा सुरळीत राखता यावा, या उद्देशाने हा 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे सिलेंडरचे वितरण योग्य पद्धतीने नियंत्रीत करता येते आणि बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून वारंवार बुकिंग करण्याऐवजी आपल्या वापराचे नियोजन करूनच बुकिंग करणे अधिक योग्य ठरते.
DAC कोडशिवाय डिलिव्हरी नाही
सिलेंडर डिलिव्हरीच्या वेळी Delivery Authentication Code (DAC) आवश्यक असतो. हा OTP-आधारित सुरक्षा कोड ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जातो. हा कोड दिल्यानंतरच सिलेंडरची डिलिव्हरी पूर्ण केली जाते.
एकूणच, योग्य वेळेत बुकिंग करणे, e-KYC पूर्ण ठेवणे आणि अधिकृत नियमांचे पालन करणे यामुळे LPG सिलेंडर मिळण्यात येणाऱ्या अडचणी टाळता येतात. पॅनिक बुकिंग न करता नियोजनबद्ध पद्धतीने बुकिंग केल्यास सेवा अधिक जलद आणि सुलभ मिळू शकते.
