प्रताप सरनाईक यांचं डोळ्यांत पाणी आणणारं पत्र; अजित पवारांच्या आठवणींनी मन हेलावलं

प्रताप सरनाईक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही अजित पवार यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्पष्टवक्तेपणा, कामाचा धडाका आणि जनसामान्यांशी असलेली घट्ट नाळ यामुळे अजित पवार हे सर्वपक्षीय नेत्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांतील नेते भावूक झाले असून अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे.

या शोकसागरात मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेलं एक भावनिक पत्र सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रातील प्रत्येक ओळ अजित पवार यांच्याशी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक नात्याची, आपुलकीची आणि ऋणानुबंधांची साक्ष देणारी आहे. हे पत्र वाचताना कुणाच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

प्रताप सरनाईक यांनी पत्राची सुरुवातच अत्यंत हृदयद्रावक शब्दांत केली आहे.
“प्रिय अजितदादा, आज हे पत्र लिहिताना वेळ थांबलेली वाटते. मन अजूनही मान्य करायला तयार नाही की तुम्ही आपल्यात नाहीत,” असे लिहित त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. गेली ३० ते ३५ वर्षे अजित पवार यांच्यासोबतचा प्रवास हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

Related News

विद्यार्थी संघटनेतील साधा कार्यकर्ता ते युवक काँग्रेस आणि ठाणे महापालिकेतील नगरसेवक असा आपला प्रवास अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य झाला, असं सरनाईक यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. बारामतीला झालेल्या भेटी या केवळ राजकीय चर्चा नसून त्या जीवनाचे धडे देणाऱ्या असायच्या, असं सांगताना त्यांनी अजित पवार यांची कामाची शिस्त, स्वच्छतेकडे असलेला कटाक्ष आणि नातेसंबंध जपण्याची वृत्ती यांचा विशेष उल्लेख केला आहे.

“प्रतापला मदत करायचीय,” असं हसत म्हणणारे अजित पवार आणि त्यांच्या पाठीशी कायम उभं असलेलं भक्कम पाठबळ, ही आठवण सरनाईक यांनी खास शब्दांत मांडली आहे. अजित पवार यांनी नातेसंबंध कसे जपायचे हे केवळ सांगितले नाही, तर प्रत्यक्ष जगून दाखवलं, असंही त्यांनी लिहिलं आहे.

पत्रातील सर्वात भावूक प्रसंग म्हणजे जुलै २००८ मधील सिद्धिविनायक मंदिरातील रत्नजडीत मोबाईलचा उल्लेख. “तो मोबाईल नव्हता दादा, ते माझ्या मनातलं तुमच्यावर असलेलं प्रेम होतं,” असे शब्द आजही अनेकांच्या काळजाला चटका लावणारे आहेत. आजही लोक त्या घटनेमुळे आपली ओळख करतात, यामागे अजित पवार यांचंच नाव असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

कॅबिनेट बैठकीनंतर दिलेलं आमंत्रण आणि त्यानंतर लगेच आलेली दुःखद बातमी, यामुळे हा धक्का अजूनही स्वीकारता येत नसल्याचं सरनाईक लिहितात. “राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मला आपलंसं केलंत,” हा विश्वास आणि प्रेम आपण आयुष्यभर जपणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.

पत्राच्या शेवटी प्रताप सरनाईक लिहितात,
“तुमचं जाणं म्हणजे फक्त एका मोठ्या नेत्याचं नाही, तर माझ्या आयुष्यातील एका मार्गदर्शकाचं जाणं आहे. तुमची उणीव शब्दांत मांडता येणार नाही.”

हे पत्र म्हणजे केवळ श्रद्धांजली नसून, अजित पवार आणि प्रताप सरनाईक यांच्यातील नात्याचा जिवंत दस्तऐवज ठरत आहे. अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याचं हे शब्द पुन्हा एकदा अधोरेखित करतात.

read also :  https://ajinkyabharat.com/pf-balance-check-online-2026-3-powerful-and-easy-methods-to-check-pf-balance-at-home-get-complete-information-in-1-minute/

Related News