बाळापूर तालुक्यातील दुर्गम आणि शेवटच्या टोकावर असलेल्या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून हे रस्ते अक्षरशः जिवघेणे ठरत आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाण्यासाठी असलेले रस्ते खड्ड्यांनी भरलेले, अरुंद, मोडकळीस आलेले असून प्रवासी वाहन, दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांमुळे नागरिकांना रोजच नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.
या दुर्गम भागातील रस्त्यांवरून रुग्णांना रुग्णालयात नेताना अनेक वेळा गंभीर अडचणी निर्माण होत असून काही ठिकाणी रुग्णाचा जीवही गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, या गंभीर बाबीकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी, प्रशासन किंवा स्थानिक आमदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे.
वाडेगावपासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेले बल्हाडी हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे. या गावातील विद्यार्थी, शेतकरी, कामगार तसेच सामान्य नागरिक आपल्या दैनंदिन दळणवळणासाठी वाडेगाव येथे ये-जा करतात. मात्र बल्हाडी गावाला जोडणारा रस्ता आणि त्यावरील अरुंद पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या रस्त्याची दुरवस्था इतकी गंभीर आहे की कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती कायम आहे.
Related News
याच धोकादायक परिस्थितीचा प्रत्यय १७ जानेवारी रोजी दुपारी आला. बल्हाडी गावात आलेल्या पाहुण्यांची चारचाकी गाडी पुलावरून जात असताना तोल जाऊन थेट खाली कोसळण्याच्या स्थितीत आली होती. सुदैवाने मोठा अपघात टळला आणि जीवितहानी झाली नाही. मात्र ही घटना प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरली आहे. जर त्या वेळी गाडी पुलावरून खाली पडली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बल्हाडी गावाची लोकसंख्या सुमारे ९०० ते १००० इतकी आहे. या गावातील नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता, पूल, आरोग्य सुविधा यांसारख्या गरजेच्या सोयींसाठी अनेक वेळा तक्रारी, निवेदने देऊनही कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “फक्त निवडणुकीच्या काळातच आमच्या मतांची आठवण येते का?” असा खोचक आणि संतप्त सवाल गावकरी उपस्थित करत आहेत.
या दुर्गम भागातील रस्ते केव्हा दुरुस्त होतील, पूल केव्हा मजबूत केला जाईल आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा कधी मिळणार, असे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवरच राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/considered-a-major-police-action-under-operation-prahar/#google_vignette
