पातुर प्रतिनिधी : पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खानापूर रोडवरील ओम साई नगर परिसरात दिवसा ढवळ्या घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली तब्बल ३५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे या रस्त्यावर व्यवसाय करणारे व्यापारी तसेच वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पातुर येथील काशिदपुरा भागात वास्तव्यास असलेले जावेद खान रियासत खान (वय ६० वर्षे) हे दिनांक १६ जानेवारी रोजी दुपारी आपल्या स्कुटीने खानापूर रोडवरील ओम साई नगर परिसरात आले होते. काही कामानिमित्त त्यांनी स्कुटी रस्त्याच्या कडेला उभी केली होती. त्यांनी स्कुटीच्या डिक्कीमध्ये ३५ हजार रुपयांची रोख रक्कम सुरक्षित ठेवली होती.
दुपारी बारा वाजताच्या सुमारास अंदाजे २७ वर्षीय एक अनोळखी व्यक्ती, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केलेली, संशयास्पदरीत्या स्कुटीजवळ फिरताना दिसून आली. काही क्षणातच त्या इसमाने स्कुटीची डिक्की उघडून त्यामधील ३५ हजार रुपयांची रोकड चोरून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. चोरी करून पळून जाताना सदर इसम फिर्यादी जावेद खान यांच्या नजरेस पडला. मात्र, तोपर्यंत तो गर्दीचा फायदा घेत पसार झाला.
Related News
या घटनेनंतर जावेद खान यांनी तात्काळ पातुर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून पातुर पोलीस स्टेशनचे पीएसआय बंडू मेश्राम यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अपराध क्रमांक २६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) अधिनियमाच्या कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय रमेश खंडारे करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत असून, संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय करण्यात आली आहेत. चोरीच्या घटनेत वापरलेला मार्ग, आरोपीचे वर्णन आणि वेळ लक्षात घेऊन पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात येत आहेत.
खानापूर रोड हा पातुर शहरातील वर्दळीचा आणि व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचा रस्ता आहे. दिवसा ढवळ्या अशा प्रकारची चोरी झाल्याने व्यापारी वर्गात तसेच नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. “दिवसा देखील वाहनांची सुरक्षितता राहिलेली नाही,” अशी प्रतिक्रिया काही स्थानिक नागरिकांनी दिली. पोलिसांनी नागरिकांना आपल्या वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू किंवा रोकड ठेवताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल, असा विश्वास पातुर पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
