बोर्डी येथे नागास्वामी इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

बोर्डी

अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथील श्री नागास्वामी इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानासोबत संस्कार आणि व्यावहारिक ज्ञान देणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश दिवनाले यांनी यावेळी केले. कार्यक्रमासाठी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन प्रा. राजेश दिवनाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि उद्योजकतेची बीजे लहान वयापासून रोवणे आवश्यक आहे. बाल आनंद मेळावा हा त्यासाठी एक उत्तम माध्यम असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भविष्यात कोणताही व्यवहार आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे करू शकतात.

या आनंद मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेले विविध खाद्यपदार्थ. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या मदतीने घरून पदार्थ तयार केले आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या आवारात स्टॉल लावून त्यांची विक्री केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान, आर्थिक देवाणघेवाण, ग्राहकांशी संवाद आणि संघभावनेचे धडे मिळाले.

Related News

मेळाव्यात कचोरी, समोसा, ढोकळा, इडली-सांबार, डोसा, आलूपोंगा, भेळ, चाट कटोरी, अप्पे, पराठे, मठ्ठा, पाणीपुरी, केळीचे चिप्स, आलूवडा, वडापाव, ब्रेडपकोडे, भजी, जिलेबी, गुलाब जामून, काला जामुन, छोले भटुरे, खस्ता, शेवपुरी, चिवडा, कप केक, मसाला पेरू अशा विविध चविष्ट पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते. या पदार्थांच्या चवींनी संपूर्ण शाळा परिसर दरवळून गेला होता.

विशेष बाब म्हणजे अगदी लहान वर्गातील विद्यार्थ्यांनीसुद्धा या आनंद मेळाव्यात स्टॉल लावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला. विद्यार्थ्यांनी विक्री करताना दाखवलेला आत्मविश्वास आणि शिस्त पाहून उपस्थित पालक व पाहुणे भारावून गेले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनीही स्टॉलवरून पदार्थ खरेदी करून त्याची मनमुराद चव घेतली.

यावेळी नागास्वामी इंग्लिश स्कूलचे संचालक सुरेश गायकवाड, सौ. अनासने मॅडम, गाडगे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त कला आणि व्यावसायिक गुण विकसित होतात, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागास्वामी इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकवृंदाने विशेष मेहनत घेतली. नियोजनबद्ध आयोजन, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा बाल आनंद मेळावा एक आदर्श उपक्रम ठरला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. राजेश दिवनाले यांनी विद्यार्थी व पालकांना संबोधित करत शाळा केवळ शिक्षण देण्याचे केंद्र नसून संस्कार घडविण्याचे मंदिर आहे, असे सांगितले. अशा उपक्रमांतूनच जबाबदार, सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

read also :  https://ajinkyabharat.com/jalna-crime-40-year-old-ramnath-bhojnes-death-case-stirs-up-dead-body-found-in-talawat-5-shocking-stories-revealed/

Related News