अकोट – श्रीजी कॉलनी येथील सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे कुमकुम तिलक करून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करून औपचारिक कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया असून उपाध्यक्ष लूणकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, तसेच रेखा चांडक, शारदा लखोटिया, सुधा डागा, प्रभूदास नाथे यांची उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, रिंकू अग्रवाल, पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, मालती महल्ले आणि सारिका रेडे यांनीही मंचावर उपस्थित राहून कार्यक्रमास महत्व दिले.
कार्यक्रमात नववीच्या विद्यार्थ्यांनी जिजामाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मनोगत मांडले. अभिनव माकोडे आणि उत्कर्ष गावंडे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. तसेच सृष्टी देशमुख यांनी त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना आणि योगदानाची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. ममता श्रावगी यांनी जिजामाता यांच्या जीवनातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले, तर रिंकू अग्रवाल यांनी स्वामी विवेकानंद यांचे जीवनातील प्रसंग उलगडले.
Related News
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे जिजामाता व स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचा सजीव अभिनय. अनन्या घनबहादूरने जिजामाता, तर उत्कर्ष कोकाटे यांनी स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारून उपस्थितांना त्यांच्या समोर थेट जिजामाता व स्वामी विवेकानंद असण्याचा अनुभव दिला. कार्यक्रमाचे संचालन वंश गोरे आणि विनीत जेस्वानी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आदित्य ढेपे यांनी पार पाडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वनिता थोरात, सृष्टी देशमुख, मुकेश काहार, दीप्ती अग्रवाल, नालंदा बोरकर, सुमती वानखेडे, रेखा घटोळ आणि सुरेखा कावरे यांनी अथक मेहनत घेतली. या सणासुदीच्या वातावरणात विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन इतिहासातील महान व्यक्तिमत्वांचा आदर व्यक्त केला आणि त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेतली.
या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची जाण, राष्ट्रभावना आणि जीवनातील आदर्श व्यक्तिमत्वांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच त्यांच्या आयुष्यात मूल्ये, धैर्य आणि समर्पण यांचे महत्त्व कसे आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.
