काळा रविवार : भेंडगाव येथील शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू; पती नितीन गावंडे गंभीर, नागपूर येथे उपचार सुरू

भेंडगाव

बार्शीटाकळी प्रतिनिधी

रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ हा दिवस पिंजर परिसरासाठी अत्यंत दुःखद ठरला. तालुक्यात घडलेल्या सलग अपघातांच्या घटनांमुळे हा दिवस नागरिकांकडून “काळा रविवार” म्हणून ओळखला जात आहे. याच दिवशी पिंजरजवळील मौजे भेंडगाव येथील रहिवासी व ज्ञानप्रकाश विद्यालयातील शिक्षिका वैशाली नितीन गावंडे (वय ४२) यांचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती नितीन गावंडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, नितीन गावंडे व त्यांची पत्नी वैशाली हे दोघे रविवारी सकाळी भेंडगाव येथून अमरावतीकडे दुचाकीने निघाले होते. त्यांची मोठी मुलगी स्नेहा ही अमरावती येथे पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत आहे. रविवार असल्याने मुलीला घरचा जेवणाचा डबा घेऊन जाण्याच्या आनंदात हे दांपत्य निघाले होते. मात्र नियतीने त्यांच्यावर घाला घातला. विळेगाव फाट्याजवळ एका अज्ञात टिप्परने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की वैशाली गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

Related News

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत नितीन गावंडे यांना रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

वैशाली गावंडे या पिंजर येथील ज्ञानप्रकाश विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शांत, सालस आणि प्रेमळ स्वभावामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये तसेच सहकारी शिक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत्या. नितीन गावंडे यांचे पिंजर येथे ‘गावंडे ट्रेडर्स’ नावाचे दुकान असून त्यांच्याकडे शेती व्यवसायही आहे. कुटुंबाचा गाडा सुरळीतपणे चालवित असतानाच या अपघाताने सर्व काही उध्वस्त केले.

या दांपत्याला तीन मुले आहेत. मोठी मुलगी स्नेहा अमरावती येथे शिक्षण घेत आहे, तर पियुष आणि प्रितेश ही जुळी मुले अजून लहान आहेत. आईच्या अकाली जाण्याने ही मुले पोरकी झाली असून संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने भेंडगाव, पिंजरसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, ११ जानेवारी रोजी पिंजर सर्कलमध्ये घडलेल्या अनेक किरकोळ अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अवजड वाहनांची बेफिकीर वाहतूक, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रदीप गावंडे, तालुका उपाध्यक्ष दीपक जाधव तसेच इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी व कुटुंबीयांची भेट घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. “ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची हानी आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

एक आनंदाचा रविवार क्षणात काळा बनला. मुलीसाठी प्रेमाने नेलेला डबा रक्ताने माखलेल्या रस्त्यावर पडला आणि एका शिक्षिकेचा जीवनप्रवास तिथेच थांबला. या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि अवजड वाहनांवर नियंत्रणाची गरज अधोरेखित केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/saag-becomes-delicious-or-5-amazing-tips-to-make-home-cooked-saag-amazing/

Related News