प्रगतीच्या वाटा : ग्रामपुत्र जैविक शेती मिशनचा यशस्वी प्रयोग शेतकऱ्यांच्या हातात उद्योगाची सूत्रे; ‘अग्रोटेक २०२५’ मध्ये लाखोंची उलाढाल

ग्रामपुत्र

शेती म्हणजे केवळ कच्चा शेतमाल विक्रीपुरती मर्यादित बाब नसून, त्यावर प्रक्रिया करून त्याला उद्योगाचे स्वरूप दिल्यास शेतकरीही यशस्वी उद्योजक होऊ शकतो, हे मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपुत्र जैविक शेती मिशन कंपनीने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत संपूर्ण देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येत असून, त्याचाच एक यशस्वी नमुना म्हणून ग्रामपुत्र कंपनीकडे पाहिले जात आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक (नैसर्गिक) शेती मिशन, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या कंपनीने मागील पाच वर्षांपासून शेतकरी कुटुंबांना केवळ उत्पादनापुरते न थांबवता, प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग आणि थेट विक्रीपर्यंतचा संपूर्ण प्रवास आत्मसात करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आज चिल्लर तसेच ठोक विक्री व्यवस्थेत आत्मविश्वासाने सहभागी होताना दिसत असून, त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे दिनांक २७ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अग्रोटेक २०२५’ मध्ये ग्रामपुत्र जैविक शेती मिशनचा प्रभावी ठसा उमटला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्वतंत्र विक्री दालने उपलब्ध करून देण्यात आली होती.

Related News

या प्रदर्शनात ग्रामपुत्र कंपनीशी संलग्न शेतकरी गट व महिला बचत गटांनी शेतमालावर प्रक्रिया करून तयार केलेल्या विविध ब्रॅण्ड्सचे सहा ते सात स्टॉल्स उभारले होते. या स्टॉल्सद्वारे सेंद्रिय धान्ये, डाळी, पीठ, मसाले, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आदींची विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या स्टॉल्सवरून लाखो रुपयांची उलाढाल झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीला बाजारपेठेत योग्य मोबदला मिळू शकतो, हे अधोरेखित झाले.

या उपक्रमात

  • श्री राजेश चोपडे (माटोडा) यांचा ‘कृष्णा’ ब्रॅण्ड,

  • सौ. शीतल किशोरराव गाडगे यांच्या अहिल्याबाई स्वयं-सहायता समूहाचा स्टॉल,

  • सौ. संगीता ढोकणे, सौ. साधना धामणे, सौ. राधिका धामणे, सौ. शारदा धामणे यांचा जय भोले महिला बचत गट,

  • श्रीराम हरणे, श्री लक्ष्मण धामणे, श्री दिलीप रिसोडे यांचा एकता शेतकरी बचत गट,

  • श्री गणेश चंपतराव चोपडे यांचा स्टॉल,

  • तसेच सौ. संगीता व श्री गजानन ढोकणे यांचा ‘अमृत’ ब्रॅण्ड
    यांचा विशेष सहभाग लाभला.

या सर्व गटांनी सेंद्रिय व नैसर्गिक पद्धतीने उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून आकर्षक पॅकेजिंगसह तो ग्राहकांपर्यंत पोहोचवला. परिणामी ग्राहकांनाही भेसळमुक्त, विषमुक्त व दर्जेदार शेतमाल योग्य दरात उपलब्ध झाला. त्यामुळे शेतकरी व ग्राहक यांच्यात थेट नाते निर्माण होऊन विश्वासार्ह बाजारपेठ उभी राहत असल्याचे चित्र दिसून आले.

विशेषतः माटोडा गावातील शेतकऱ्यांना या उपक्रमामुळे उद्योगविश्वात नवे स्थान मिळाले आहे. शेतीसोबतच प्रक्रिया उद्योग, विक्री आणि ब्रॅण्ड निर्मिती यांचा प्रत्यक्ष अनुभव आल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात स्वतःचे उद्योग उभारण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. केवळ आर्थिक लाभच नव्हे, तर सामाजिक प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानातही वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

या यशस्वी वाटचालीमागे ग्रामपुत्र जैविक शेती मिशन कंपनीचे सचिव श्री गजाननभाऊ ढोकणे यांचे विशेष योगदान असून, कंपनीच्या संचालक मंडळाचा त्यांना भरीव पाठिंबा लाभत आहे. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, अकोला येथील अधिकारी वर्ग, मॉमचे संचालक मंडळ, नाबार्डचे श्री वाघमारे (डीडीएम, नाबार्ड अकोला), आत्मा विभाग, कृषी विभाग, मा. इंगळे साहेब (जिल्हा कृषी अधीक्षक, अकोला), कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) तसेच मूर्तिजापूर कृषी व आत्मा विभागातील अधिकारी व कृषी सहाय्यक यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा योग्य उपयोग, शेतकऱ्यांचा सहभाग आणि सक्षम मार्गदर्शन यांचा संगम साधला, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडू शकतो, हे ग्रामपुत्र जैविक शेती मिशनच्या या यशस्वी प्रयोगातून स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात उद्योगाची सूत्रे देणारी ही वाटचाल भविष्यात अनेक गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

read also : https://ajinkyabharat.com/akola-bjp-municipal-election-candidate-list-2025-historical-list-released-big-powerful-decision-of-bjp-with-62-candidates/

Related News