सौंदळा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; २७५ रुग्णांची तपासणी

सौंदळा

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे प्रशांत डिक्कर मित्र परिवार ग्रुपच्या वतीने दि. २१ डिसेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य रोगनिदान व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरलेले हे शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. या शिबिराचा एकूण २७५ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यामध्ये १५४ महिला व १२१ पुरुषांचा समावेश होता. मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीमुळे हे शिबिर तालुक्यातील एक महत्त्वपूर्ण सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम ठरले.

ग्रामीण भागात तज्ज्ञ वैद्यकीय सेवांचा अभाव लक्षात घेता अशा प्रकारची शिबिरे नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक असतात. याच उद्देशाने प्रशांत डिक्कर मित्र परिवार ग्रुपने पुढाकार घेत या आरोग्य शिबिराचे आयोजन केले. सकाळपासूनच रुग्णांची गर्दी शिबिरस्थळी दिसून आली. अनेक नागरिकांनी वेळेवर येऊन तपासणी करून घेतली तसेच डॉक्टरांकडून योग्य सल्ला व उपचार घेतले.

या शिबिरात अकोला येथील नामवंत व अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांनी आपली सेवा नि:स्वार्थ भावनेने दिली. यामध्ये युरोलॉजिस्ट व किडनी-मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. आशिष बाळकृष्ण राऊत, स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. महेश ग. देशमुख तसेच स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. बी. यशश्री म. देशमुख यांचा प्रामुख्याने समावेश होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमुळे रुग्णांना अचूक निदान व योग्य मार्गदर्शन मिळाले.

Related News

शिबिरामध्ये पुरुषांसाठी प्रोस्टेट ग्रंथी, किडनी व मूत्रमार्गाशी संबंधित आजारांची तपासणी व सल्ला देण्यात आला. तर महिलांसाठी स्त्रीरोग व प्रसूतीसंबंधी आजारांचे निदान करण्यात आले. विशेषतः महिलांसाठी गर्भाशय मुख कर्करोगाची पॅप स्मियर चाचणी मोफत करण्यात आली, जी ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. अनेक महिलांनी या चाचणीचा लाभ घेतला. यासोबतच आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही मोठा दिलासा मिळाला.

शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनेक कार्यकर्ते, डॉक्टर व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये ज्ञानेश्वर ससे, डॉ. सोनाली वाघमारे, क्रांती तेलगोटे, शुभम वायकर, शुकलाल सुलताने, विजय कोकरे, हिमांशु म्हैसने (पॅथॉलॉजी) यांच्यासह मित्र परिवारातील स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, सरपंच विनोदभाऊ मिरगे, ज्ञानेश्वरभाऊ गोतमारे, सचिनभाऊ अरबट, बाळूभाऊ जवंजाळ, अरुणभाऊ छित्रे, माणिकभाऊ खिरसान, नवलकुमार अरबट, डॉ. प्रमोद अरबट, देवानंद खंडेराव, शामभाऊ गोडे, कुलदीप बाजारे, केशवभाऊ शेगोकार, आशिषभाऊ शेळके, प्रज्वलदादा बुरघाटे, शिवमभाऊ ईसापूरे, आकाश महाले, रुषिकेश इंगळे, सुजय वाघ आदींचा समावेश होता.

शिबिराच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे व डॉक्टरांचे आभार मानले. ग्रामीण भागात अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. प्रशांत डिक्कर मित्र परिवार ग्रुपच्या या उपक्रमामुळे सौंदळा परिसरात सामाजिक बांधिलकीचे एक सकारात्मक उदाहरण निर्माण झाले असून भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, अशी ग्वाही आयोजकांनी दिली.

read also : https://ajinkyabharat.com/haji-syed-akbar-urdu-school-anand-melawa-utshat/

Related News