डोके व मानेचे हाड तुटल्याने १५ जणांचा मृत्यू – ७४ जणांचा गुदमरून मृत्यू
हाथरस येथे चेंगराचेंगरीत मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी
आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते.
Related News
मृतांच्या शवविच्छेदनाच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
तसेच, चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर बाबा नारायण हरी
ऊर्फ सक्कर विश्व हरी भोलेबाबा याच्या येथील आश्रमाबाहेर
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बाबाच्या ठावठिकाणाबाबत अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले आहे.
तो आश्रमातच असल्याचे काही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
या बाबाच्या हाथरस येथील सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा बळी गेला,
तर ३१ जण जखमी झाले.
मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी सांगितले की,
शवविच्छेदन अहवालानुसार छातीच्या पोकळीत रक्त साचल्याने,
श्वासोच्छवास आणि बरगडीच्या जखमांमुळे लोकांचा मृत्यू झाला.
मथुरा, आग्रा, पिलीभीत, कासगंज आणि अलीगढ येथून
२१ मृतदेह एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये
आणण्यात आले होते.
येथे डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले.
मृतदेह येताच मंगळवारी रात्रीपासून मृतांच्या नातेवाईकांनी
शवागरात गर्दी करण्यास सुरुवात केली.
शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी हाथरस दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी जाहीर केली आहे.
८० हजार लोकांची मर्यादा असताना अडीच लाख कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजकांनी पुरावे लपवण्याचा
आणि अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत
आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दोन लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते.
भोलेबाबा दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले.
एक तास हा कार्यक्रम सुरू होता.
दुपारी १.४० च्या सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन
इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होते.
त्याच वेळी भाविक त्यांच्या दिशेने पळाले
तसेच बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी
पळापळ करू लागले असे अहवालात नमूद केले आहे.
अधिकाधिक नागरिक महाराजांच्या वाहनाच्या दिशेने पळू लागल्यावर परिस्थिती गंभीर झाली.
बाबाच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मागे ढकलले.
त्यामुळे काही नागरिक खाली पडले.
खुल्या मैदानात जाण्यासाठी नागरिक धावपळ करू लागले.
यातून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मैदान निसरडे असल्याने नागरिक घसरून पडले.
जे नागरिक पडले ते पुन्हा उठू शकले नाहीत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
त्यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी अशा कार्यक्रमांना परवानगी देताना
नियमावली करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून या घटनेची चौकशी केली जाईल.
सरकारने विशेष तपास पथक स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.
भोलेबाबाचे नाव गुन्ह्यात नसल्याबद्दल विचारता,
आदित्यनाथ यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले.
जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले.
या घटनेमागे षड्यंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही
असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या घटनेत २८ जण जखमी झाले.
मृतांमध्ये अजून चौघांची ओळख पटली नाही.