मराठी टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं 31 ऑगस्ट 2025 रोजी कर्करोगामुळे निधन झालं. तिच्या अचानक झालेल्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व हादरलं. प्रियाची आजाराशी झुंज अत्यंत खंबीरपणे सुरू होती, मात्र अखेरीस मृत्यूशीची ही लढाई अपयशी ठरली. तिचा पती आणि सुप्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे गेल्या महिनाभरात कुठेही व्यक्त झाला नव्हता. पण प्रियाच्या निधनाला आज एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शंतनूने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने प्रियाबद्दलचं प्रेम, तिच्या जाण्याचं दुःख आणि या काळात साथ देणाऱ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याने लिहिलंय, “प्रियाच्या जाण्यामुळे झालेली वैयक्तिक हानी आणि दु:ख शब्दांत मांडणं शक्य नाही. ती प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांची काळजी घेणारी होती. तिच्या जाण्यानं जीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे.” त्याने पुढे देवाला उद्देशून एक हृदयस्पर्शी वाक्य लिहिलं आहे, “देवा, तिची काळजी घे, तिच्यावर खूप प्रेम कर, आणि जर कोणतीही चूक झाली तर तुला माफ करणार नाही. या भावनिक पोस्टसोबत शंतनूने प्रियासोबतचे काही आठवणींनी भरलेले फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी, सहकलाकारांनी आणि मित्रपरिवाराने या पोस्टवर शोक व्यक्त केला असून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं आहे.
read also:https://ajinkyabharat.com/arogya-hitch-khari-sampathi/
