अकोला – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी घेतलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळात स्कायमेट कंपनीने बसवलेले वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे पावसाचे योग्य मोजमाप होऊ शकले नाही. परिणामी, प्रत्यक्ष पिकांचे नुकसान असूनही शासनाच्या नोंदीत ते कमी दाखवले गेले असून तब्बल 2000हून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या भागात कार्यरत वेदर स्टेशन सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या ओढ्याच्या पात्रात बसवण्यात आले होते. 17 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसावेळी यंत्रावर थेट पाणी वाहले, ज्यामुळे हवामान खात्याला चुकीचा अहवाल मिळाला. शेतकऱ्यांनी या प्रकरणावर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून, तातडीने प्रत्यक्ष झालेले नुकसान लक्षात घेऊन भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकरी दिगंबर ठाकरे यांनी सांगितले, “यंत्र नाल्यामध्ये बसवल्यामुळे पावसाचे मोजमाप अचूक झाले नाही. त्यामुळे आम्ही अतिवृष्टीच्या नियमांमध्ये बसत नाही. सरकारी मदत मिळावी यासाठी योग्य निर्णय हवा.” हवामान यंत्राच्या चुकीच्या ठिकाणी बसवल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले असून, तांत्रिक बिघाडासह चुकीच्या जागेमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
read also:https://ajinkyabharat.com/8-tasanchaya-shift-differences/
