नालंदा नगरातील नाली बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार

४७ लाखांचा खर्च, तरीही नाल्यांना पाझर!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत नालंदा नगर (प्रभाग क्र. ५) येथे सुरू असलेल्या नाली बांधकाम आणि रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आणि अनियमितता असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. एकूण १८० मीटर लांबी४.६ मीटर रुंदी असलेल्या रस्ता आणि नाली बांधकामासाठी ४७ लाख २७ हजार ७०० रुपये इतकी अंदाजपत्रक रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मात्र, कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून जागोजागी नाल्यांना पाझर फुटल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून हे काम प्रलंबित होते. मात्र, आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेमुळे हे काम गडबडीत सुरू करण्यात आले. मुदत संपल्यानंतरही काम पूर्ण झालेले नाही.
विशेष म्हणजे, ९ मीटर रुंदीचा रस्ता फक्त ५ मीटरवर आणण्यात आल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.

नालींना जागोजागी पाझर फुटले,रस्त्याची रुंदी कमी केली,निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा संशय,वेळेत काम पूर्ण न झाल्याने नागरिक त्रस्त.

या कामाचे क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे आणि प्रशासकांकडे तक्रार केली असली तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आमच्या भागात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू आहे. ९ मीटरचा रस्ता ५ मीटरवर आला, नाल्यांना पाझर फुटले. आमच्या पैशांचा वापर योग्यरित्या होत नाही.”

४७ लाखांच्या कामात निकृष्ट दर्जा,नाल्यांना पाझर फुटल्याने कामाची पोलखोल,नागरिकांची स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी,प्रशासनाची भूमिकेवर प्रश्नचिन्ह.