हैदराबाद : सनरायर्झ हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. अखेरच्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने विकेट काढत हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. हैदराबादच्या संघाने दणदणीत फटकेबाजी करत २०२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची २ बाद १ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रायन पराग यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानच्या विजयाची आशा निर्माण झाली होती. पण अखेरच्या षटकात भुवीने दमदार गोलंदाजी करत संघाला एका धावेने विजय मिळवून दिला.
हैदराबादच्या २०२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संघाला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच चेंडूवर जोस बटलरला शून्यावर बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आला तो राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन. भुवीने संजूला यावेळी पाचव्या चेंडूवर बाद केले आणि राजस्थानला दुहेरी धक्का दिला. संजूलाही यावेळी भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे पहिल्याच षटकात राजस्थानची २ बाद १ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण यावेळी राजस्थानच्या मदतीला धावून आले ते यशस्वी जैस्वाल आणि रायन पराग.
यशस्वी आणि रायन या दोघांनीही यावेळी कसलेच दडपम न घेता हैदराबादच्या गोलंदाजीचा समाचार घ्यायला सुरुवात केली. त्यामुळेच दोन विकेट्स पहिल्या षटकात गमावून झाल्यावरही राजस्थानने ४.५ षटकांत आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी जैस्वाल यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडत होता. यशस्वीने यावेळी ३० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वी आणि रायन या दोघांनी यावेळी तिसऱ्या विकेटसाठी १०० धावा केल्या त्या ५८ चेंडूंत. त्यानंतर रायननेही आपले अर्धशतक ३१ चेंडूंत पूर्ण केले. ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत होते. पण त्याचवेळी यशस्वी बाद झाला आणि ही जोडी फुटली. यशस्वीने यावेळी ४० चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६७ धावा केल्या. यशस्वी बाद झाल्यावर रायन जास्त काळ टिकू शकला नाही. रायनला पॅट कमिन्सने बाद करत हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. रायनने यावेळी ४९ चेंडूंत ८ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ७७ धावांची खेळी साकारली.
यशस्वी आणि रायन बाद झाल्यावर राजस्थानचा डाव अडचणीत सापडणार का, असे वाटत होते. पण हे दोघे बाद झाल्यावर राजस्थानला लय सापडली नाही आणि त्यामुळेच त्यांना एका धावेने पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, हैदराबादच्या संघाने राजस्थानच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. सलामीवीर ट्रेव्हिस हेडने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. हे बाद झाला पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नितिश कुमार रेड्डी आणि हेन्रिच क्लासिन यांनी अखेरच्या षटकांत राजस्थानच्या गोलंदाजीची पिसे काढली. नितिश कुमार रेड्डीने यावेळी ४२ चेंडूंत तीन चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद ७८ धावांची धडाकेबाज खेळी साकारली, त्याला क्लासिनने १९ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाज ४२ धावा करत सुयोग्य साथ दिली. नितिश कुनार रेड्डी आणि हेन्रिच क्लासिन यांच्या धमाकेदार फटकेबाजीच्या जोरावर हैदराबादच्या संघाला २०१ धावांचा डोंगर उभारता आला.