उपराष्ट्रपती पदासाठी NDAचा उमेदवार जाहीर

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उमेदवार म्हणून जाहीर

विरोधकांमध्ये हालचाली वेगवान; तामिळनाडूतून उमेदवार देण्याची चर्चा

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.

भाजप संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली. एनडीएतील घटकपक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना उमेदवार निवडीचा

अधिकार दिला होता.भाजपकडून बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरू असून, आता विरोधक म्हणजेच इंडिया आघाडी कडून उमेदवारी जाहीर होते का,  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विरोधी पक्षांचा उमेदवार कोण?

एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर विरोधकांच्या हालचाली वाढल्या आहेत. अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी

तामिळनाडूतून उमेदवार देण्याची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील सत्ताधारी द्रमुक पक्ष आपल्या नेत्याला उमेदवार करण्याचा विचार करत आहे.

मात्र, याबाबत अद्याप द्रमुककडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

काही अहवालांनुसार, एनडीएने राधाकृष्णन यांचं नाव जाहीर करण्यापूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली होती.

तामिळनाडूत 2026 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने या हालचालींना राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक

  • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 21 ऑगस्ट

  • मतदानाची तारीख : 9 सप्टेंबर

भाजपचं धक्कातंत्र

सी.पी. राधाकृष्णन हे आरएसएसशी संबंधित असून, जनसंघातही त्यांनी काम केलं आहे. ते पश्चिम तामिळनाडूमधील गौंडर समाजाचे प्रतिनिधी आहेत.

त्यांच्या उमेदवारीनं दक्षिण भारतात भाजप आपला प्रभाव वाढवू पाहत असल्याचं मानलं जात आहे.

काँग्रेसशी संवाद

भाजपनं उमेदवार जाहीर केल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली.

या चर्चेत निवडणूक बिनविरोध व्हावी याबाबतचा मुद्दा उपस्थित झाल्याचं समजतं.

 आता विरोधक उमेदवार देतात का, आणि निवडणूक टक्करदार होते का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/valmik-karadala-jamin-minar/