कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत मुंबईत धडक मोर्चाची घोषणा केली आहे. “सरकार शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करत आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आम्ही आंदोलन करणारच,” असा इशारा त्यांनी दिला.
गेल्या काही महिन्यांतील अवकाळी पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि बदलत्या हवामानामुळे कोकणातील आंबा व काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षा’ निवासस्थान असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. “सरकारच्या मनात आंबा उत्पादकांना हेक्टरी अवघे २२ हजार रुपये द्यायचे आहेत. म्हणजे एका झाडाला फक्त २२० रुपये. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.
Related News
त्यांनी पुढे सांगितले की, निर्यात होणारा एक आंबा ५०० रुपयांना विकला जातो. अशा परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना किमान योग्य भरपाई मिळायला हवी. “शेतकऱ्यांना गृहीत धरण्याची चूक सरकारने करू नये. आता आम्ही गप्प बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
आंब्यासाठी ५ लाख, काजूसाठी ३ लाखांची मागणी
राजू शेट्टी यांनी कोकणातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत सरकारसमोर मोठ्या मागण्या ठेवल्या. आंबा बागायतदारांना हेक्टरी ५ लाख रुपये तर काजू उत्पादकांना ३ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
त्यांच्या मते, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच हवामान बदलाच्या परिणामांमुळे कोकणातील बागायती संकटात सापडल्या आहेत. “ही केवळ आर्थिक मदतीची मागणी नाही, तर शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असेही ते म्हणाले.
“ठाण्याचे उपमुख्यमंत्री मग कोकणासाठी काय केलं?”
राजू शेट्टी यांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही थेट निशाणा साधला. “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं की नाही, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचा. ठाणे कोकणात येत नाही का? मग त्यांनी कोकणासाठी काय केलं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, कोकणातील शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, चर्चा झाल्या; मात्र अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. “जर सरकारने ३० जूनपर्यंत कर्जमाफी आणि नुकसानभरपाईबाबत निर्णय घेतला नाही, तर आम्ही त्यांच्या मानगुटीवर बसू,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.
पोलिसांची परवानगी नाकारली, तरी मोर्चा ठाम
मुंबई पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. तरीही आंदोलन मागे घेणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. “दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटीवर हजारो कोकणी शेतकरी एकत्र येतील आणि तिथून वर्षा बंगल्याकडे कूच करतील,” असे त्यांनी सांगितले.
वेंगुर्ला, देवगड, मालवण, रायगड, मुरबाड यांसारख्या भागांतून मोठ्या प्रमाणावर शेतकरी मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राजकीय आणि प्रशासकीय वातावरण तापले आहे.
या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत शिवसेना (ठाकरे गट), जनता दल सेक्युलर आणि मराठी अभ्यास केंद्र यांचाही पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे हा मोर्चा केवळ शेतकरी प्रश्नापुरता मर्यादित न राहता राजकीय रंगही घेत असल्याची चर्चा आहे.
उदय सामंतांचा पलटवार
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देत हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.
“मी स्वतः राजू शेट्टींशी तीन ते चार वेळा चर्चा केली आहे. त्यामुळे मोर्चाची गरज नाही. उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची दिशाभूल केली जात आहे,” असा दावा उदय सामंत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सरकारने या प्रश्नासाठी सात सदस्यीय समिती स्थापन केली असून सर्व मागण्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. “लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.
कोकणातील शेतकऱ्यांचा वाढता रोष
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक गेल्या काही वर्षांपासून हवामान बदल, बाजारातील चढउतार आणि उत्पादन खर्चवाढ यामुळे त्रस्त आहेत. त्यात यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप वाढला आहे.
शासनाकडून जाहीर करण्यात येणारी मदत अत्यल्प असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे आता हा प्रश्न केवळ आर्थिक मदतीचा न राहता राजकीय संघर्षाचे रूप घेताना दिसत आहे.
राजू शेट्टी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचा दावा करत असले तरी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटताना दिसत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/after-the-terrible-accident-hayvevar-vikhuralya/
